निर्बंध झुगारून पुण्यात दुकाने खुली; नाशिकमध्येही निदर्शने, ठाण्यात आज मूकमोर्चा

पुणे : करोना निर्बंधांविरोधात व्यापारी, उपाहारगृह व्यावसायिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुण्यात व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे आदेश धुडकावून बुधवारी दुकाने सायंकाळपर्यंत उघडी ठेवली, तर नाशिकमध्ये उपाहारगृह व्यावसायिकांनी निर्बंधांविरोधात निदर्शने केली. ठाण्यात गुरुवारी मूकमोर्चा काढण्यात येणार आहे.

राज्यातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल झाले असून, दुकानांची वेळमर्यादा वाढविण्यात आली आहे. मात्र, पुण्यातील करोनाबाधितांची संख्या कमी असताना प्रशासनाने व्यापारी दुकानांना वेळ वाढवून न दिल्याने व्यापाऱ्यांनी मंगळवारी घंटानाद आंदोलन केले. बुधवारपासून पुणे व्यापारी महासंघाने शहरातील सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी दुपारी चारनंतर शहरातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, बोहरी आळी, टिंबर मार्केट, कर्वे रस्ता, कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता आदी भागांतील दुकाने चारनंतरही उघडी ठेवण्यात आली. मात्र, तुळशीबाग, शनिपार चौक भागातील दुकाने दुपारी चारच्या सुमारास बंद करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मंडई परिसरात दुपारी चारनंतर दुकान उघडे ठेवणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी महापालिका तसेच पोलिसांच्या पथकातील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. उपाहारगृहांसाठीची वेळमर्यादा रात्री १० पर्यंत वाढवून द्यावी, या मागणीसाठी नाशिकमध्ये व्यावसायिकांनी बुधवारी आंदोलन केले. द नाशिक रेस्टॉरंट क्लस्टर, महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लब तसेच नाशिकमधील विविध उपाहारगृहांच्या चालक-मालकांनी फुड कोर्ट येथे रास्ता रोको आंदोलन के ले.

ठाणे जिल्ह्यातही उपाहारगृह व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. ठाणे जिल्ह्यात उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असून, उपाहारगृहे रविवारी बंदच राहणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या निर्बंधांविरोधात व्यावसायिक गुरुवारी मूकमोर्चा काढणार आहेत. त्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांना निवेदन देण्यात येईल.

‘वेळमर्यादा वाढवा’

उपाहारगृहांमध्ये सायंकाळी ७ नंतर ग्राहकांचा ओघ वाढतो. मात्र, सायंकाळी चारपर्यंतच उपाहारगृहे खुली ठेवण्यास परवानगी असल्याने व्यवसायच ठप्प झाला आहे. त्यामुळे उपाहारगृहे रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंटस् असोसिएशनचे (आहार) अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी केली.

पुण्यात भाजी विक्रेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

निर्बंधांचा निषेध करत महात्मा फुले मंडईतील भाजी विक्रेत्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी भाजी विक्रेत्याला ताब्यात घेतले.