‘करोना विषाणू’ची लागण झालेल्यांची भावना, रुग्णालयातून घरी

पुणे : आई-बाबा दुबईला जाऊन आल्यामुळे त्यांना करोनाची लागण झाली, त्यांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे माझ्या तपासणीतूनही करोनाची लागण असल्याचे निष्पन्न झाले. आम्ही रुग्णालयात विलगीकरणासाठी १४ दिवस राहिलो, प्रत्यक्षात आम्हाला कोणताही शारीरिक त्रास नव्हता. त्यामुळे एरवी घरात एकत्र राहूनही मिळणार नाही, असा ‘फॅमिली टाइम’ आम्ही या निमित्ताने अनुभवला! आता मात्र घर दिसू लागलंय, अशी भावना करोनाची लागण झालेल्या दांपत्याच्या मुलीने मंगळवारी व्यक्त केली.

१४ दिवसांचे विलगीकरण पूर्ण करून हे दांपत्य आणि संसर्ग नसलेला, मात्र खबरदारीसाठी विलग ठेवण्यात आलेला त्यांचा मुलगा मंगळवारी त्यांच्या घरी परतले. सहवासातून करोना संसर्ग झालेली ही मुलगी मात्र, बुधवारी घरी परतणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तिने ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.

मुलगी म्हणाली, विलगीकरणासाठी रुग्णालयात आल्यानंतर मित्रमैत्रिणी आणि नातेवाइकांशी होणारे फोन, वृत्तपत्र वाचणे आणि नेटफ्लिक्स, हॉटस्टारवरच्या वेबसिरीज पाहून वेळ घालवला. दिवसातून चार वेळा येणारे डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी यांच्याशी गप्पा मारत होतो. माझा भाऊ अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षांला शिकतो. त्याला संसर्ग नसला तरी खबरदारी म्हणून नायडू रुग्णालयातच अलगीकरणासाठी ठेवण्यात आले होते. तो पहिल्या मजल्यावर आणि आम्ही तळमजल्यावर होतो, पण आम्ही रुग्ण असल्यामुळे त्याला भेटणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्हा तिघांपेक्षा त्याचे एकटय़ाने व्यतीत केलेले १४ दिवस जास्त कठीण होते. त्यावर उपाय म्हणून ‘जर्नल्स’ पूर्ण करण्यात त्याने वेळ गुंतवला.

म्हणून सर्वानी सरकारचे ऐकायला हवे

शहरातले आम्ही करोनाचे पहिले रुग्ण, त्यामुळे पहिले १/२ दिवस सगळ्यांसाठीच संभ्रमाचे होते, पण त्यानंतर सर्व काही व्यवस्थित झाले. सकाळी चहा, नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण अशी छान सोय होती. जेवण रुग्णालयातले आहे असे वाटू नये इतके चांगले होते, पण आजूबाजूच्या वातावरणामुळे मात्र कंटाळा आला. आता कधी एकदा घरी जाऊन घरचे खातो असे झाले आहे. आईच्या मैत्रिणी, बाबांचे मित्र, नातेवाईक घरी आवश्यक गोष्टी ठेवणार आहेत. पण पुढचे किमान पंधरा दिवस कुणाला भेटायचे नाही असे आम्ही ठरवले आहे. मी घरातूनच काम करणार आहे. या आजारातून आपण नक्की बरे होतो, पण १४/१५ दिवस एकटे, वेगळे राहाणे अवघड असते, तशी वेळ कोणावरही येऊ नये, म्हणून आपण सगळ्यांनी सरकारचे ऐकायला हवे, असे आवाहन मी सगळ्यांना करते.