निवृत्त वैद्यकीय महासंचालक डॉ. साळुंखे यांची सूचना

पुणे : करोना विषाणूच्या संसर्ग रोखण्याबाबत  महिनाभर आरोग्य यंत्रणांनी केलेली तयारी आणि प्रतिबंधात्मक उपाय कौतुकास्पद आहेत, मात्र आरोग्य यंत्रणांच्या बळकटीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत आपण आजही गंभीर नसल्याचेच चित्र आहे. भविष्यात कोणत्याहीआव्हानांचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करणे हे दीर्घकालीन धोरण हवे, असे मत राज्याचे निवृत्त वैद्यकीय महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

राज्यातील यापूर्वीच्या साथ विकारांच्या काळात आरोग्य यंत्रणेचे नेतृत्व करण्याबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेबरोबर देखील डॉ. साळुंखे यांनी काम केले आहे. ‘लोकसत्ता’ने डॉ. साळुंखे यांच्याशी संवाद साधला.

डॉ. साळुंखे म्हणाले, इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतात केंद्र आणि राज्य शासनाने घेतलेले निर्णय अत्यावश्यक आहेत. सुरुवातीपासून चीनमधून भारतात येणाऱ्या नागरिकांमार्फत हा संसर्ग राज्यात येऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली. त्यासाठी विमानतळांवर तपासणीची सुरुवात करण्यात आली. शाळा, महाविद्यालयांना सुट्टय़ा, जमावबंदीसारखे निर्णय आवश्यक आहेत, ते योग्य वेळी घेण्यात आले हे महत्त्वाचे आहे.

यंत्रणा आपले काम करत आहेत. आता नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. परदेश प्रवासाचा किंवा परदेशातून आलेल्या नागरिकांचा सहवास, त्यानंतर दिसलेली आजाराची लक्षणे हे विलगीकरणाचे प्रमुख निकष म्हणून निश्चित करण्यात आले आहेत.  केंद्र आणि राज्य सरकारांनी खासगी रुग्णालयांमध्ये, नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत करोनाच्या चाचण्या उपलब्ध करून देणे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हवामानातील चढउतारांमुळे विषाणूजन्य आजारांची लागण ही सर्वसाधारण बाब आहे, त्यामुळे नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घ्यावेत, मात्र करोनाची लागण असेल अशी भीती बाळगू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. साळुंखे यांचा सल्ला

  • विलगीकरणाचे नियम पाळणे कोणत्याही परिस्थितीत आवश्यक.
  • आरोग्य यंत्रणेचे दीर्घकालीन बळकटीकरण आवश्यक आहे.
  • नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतहून निर्बंध पाळावेत. घ्यावेत, मात्र करोनाची लागण असेल अशी भीती बाळगू नये, असे आवाहनही त्यांनी केले.