पुणे : टाळेबंदी उठवल्यानंतर कच्च्या मालाच्या उपलब्धतेतील अनियमितता, कामगारांची अनुपलब्धता, वाहतुकीवर झालेला परिणाम अशा अडचणींना तोंड देत पुणे आणि परिसरातील ५१ टक्के  कंपन्यांनी करोनापूर्व काळातील उत्पादन पातळी ओलांडली आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्र टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या सर्वेक्षण मालिकेतील ११व्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. या सर्वेक्षणात पुणे आणि परिसरातील एकूण १०० पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग घेतला. फेब्रुवारीमध्ये कंपन्यांचे उत्पादन ८५ टक्क्यांपर्यंत वाढले, तर कार्यरत मनुष्यबळ ८६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांपैकी ५१ टक्के  कंपन्यांनी करोनापूर्व काळातील उत्पादन पातळी गाठल्याची माहिती दिली. तर करोनापूर्व काळातील उत्पादन गाठण्यासाठी २० टक्के  कंपन्यांना आणखी तीन महिने, १३ टक्के  कंपन्यांना तीन ते सहा महिने लागतील असे वाटते. तर १७६ टक्के  कंपन्यांनी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागण्याचा अंदाज व्यक्त केला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांमध्ये ९ टक्के  सूक्ष्म, १२ टक्के  लघु, २९ टक्के  मध्यम आणि ५० टक्के  मोठ्या उद्योग क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.  या कंपन्यांपैकी ६४ टक्के  कंपन्या उत्पादन. १४ टक्के  कंपन्या सेवा आणि अन्य कंपन्या उत्पादन, सेवा या दोन्ही क्षेत्रांतील आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेने घेतलेले सकारात्मक वळण महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय पातळीवर आपण मंदीतून बाहेर पडलो आहोत. पण हॉटेल, पर्यटन, वाहतूक अशी क्षेत्रे लवकर पूर्वपदावर येणे आवश्यक आहे. पुण्यातील कार्यरत मनुष्यबळ आणि उत्पादन वाढ अशा दोन्ही पातळ्यांवर झालेली वाढ नक्कीच महत्त्वाची आहे. – सुधीर मेहता, अध्यक्ष, एमसीसीआयए

 

५० टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी करोनापूर्व काळातील उत्पादन पातळी ओलांडली आहे आणि अन्य कंपन्याही त्या वाटेवर आहेत. पण सूक्ष्म उद्योगातील कंपन्यांना पूर्वपदावर येण्यासाठी आणखी पाच ते सहा महिने वाट पाहावी लागेल. छोट्या कंपन्यांपेक्षा मोठ्या कंपन्या लवकर पूर्वपदावर आल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. – प्रशांत गिरबने, महासंचालक, एमसीसीआयए