आरोग्य यंत्रणांकडून नागरिकांना खबरदारीचे आवाहन

पुणे : शहरातील करोना चाचण्यांची संख्या वाढवलेली नसतानाही रुग्णांच्या संख्येत मात्र दिवाळीनंतर काही प्रमाणात वाढ दिसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सामाजिक अंतर, मुखपट्टीचा वापर आणि वैयक्तिक स्वच्छतेचे नियम गांभीर्याने पाळा, असे आवाहन आरोग्य यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली. त्याचवेळी तज्ज्ञांकडून दुसऱ्या लाटेची शक्यताही वर्तवण्यात येत होती. मात्र, दिवाळीसारख्या सणाची तयारी, त्यानिमित्ताने खरेदी आणि नातेवाइकांच्या भेटीगाठी या कारणांनी नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडलेले दिसले. त्याच दरम्यान प्रवास आणि पर्यटन यांना परवानगी मिळाली. त्यामुळे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ घरात कोंडलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडण्याला पसंती दिली. भरीस भर म्हणून दिवाळीच्या दरम्यान वाढलेली थंडीही कमी झाल्याने शहरात सतत दमट हवामान राहिले. या सगळ्या बाबींचा परिणाम म्हणून १० नोव्हेंबरपर्यंत ८.२९ टक्के  एवढ्या कमी झालेल्या चाचण्यांपैकी बाधित रुग्णांचे प्रमाण वाढून बुधवारी १८ नोव्हेंबरला ते १३.९९ टक्के  एवढे झाले. ही वाढ आणखी काही दिवस अशीच कायम राहिल्यास ती दुसऱ्या लाटेची सुरुवात आहे, असे म्हणता येईल, असे तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित होत आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे साथरोग तज्ज्ञ डॉ. अतुल मुळे म्हणाले,की  दुसरी लाट येणार याबाबत आता कोणतीही साशंकता नाही, मात्र ती कधी येईल आणि तिचे स्वरूप कसे असेल याबाबत कोणताही अंदाज वर्तवणे शक्य नाही. दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी पायाभूत सुविधांची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पहिल्या लाटेच्या काळात रुग्णांवर उपचार कसे करावेत याचा पूर्ण अंदाज डॉक्टर आणि रुग्णालयांनाही आला आहे. त्या अनुभवाचा वापर दुसऱ्या लाटेच्या काळात मृत्युदर कमी ठेवण्यास होईल, असेही डॉ. मुळे यांनी स्पष्ट केले.

नियम पाळा, खबरदारी घ्या

  • अनावश्यक गर्दीच्या ठिकाणी जाणे, घरातून बाहेर पडणे टाळा.
  • घराबाहेर पडताना न विसरता मुखपट्टीचा वापर करा.
  •  वारंवार हात धुवा. सॅनिटायझर जवळ बाळगा आणि त्याचा वापर करा.
  •  सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराचा नियम पाळा. बोलताना तोंडावरची मुखपट्टी काढून ठेवू नका.
  • विषाणूजन्य आजाराचे कोणतेही लक्षण दिसल्यास अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्या.