|| राहुल खळदकर 

पुणे :  करोनाच्या संसर्गाचा राज्य तसेच परराज्यातील लॉटरी व्यवसायावर परिणाम झाला आहे. गेले दोन महिने राज्यभरातील लॉटरी स्टॉल बंद होते. त्यामुळे गुडीपाडव्याची महत्त्वाची सोडत तसेच अन्य सोडती लांबणीवर पडल्या होत्या. सणासुदीच्या काळात व्यवसाय बंद असल्याने राज्य लॉटरीची उलाढाल ठप्प झाली होती. राज्यभरातील लॉटरी स्टॉल  उघडण्यास मुभा देण्याच्या निर्णयामुळे लॉटरी व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून लॉटरीप्रेमी तसेच शौकिनांकडून तिकिटे खरेदी करण्याचे प्रमाण येत्या काही दिवसांत वाढेल, अशी आशा लॉटरी विक्रेते व्यक्त करत आहेत.

गेल्या वर्षी करोनाचा संसर्ग वाढीस लागला. त्या वेळी १८ मार्चपासून लॉटरी तिकिटांच्या  विक्रीवर निर्बंध घालण्यात आले होते. दोन ते अडीच महिन्यानंतर पुन्हा लॉटरी विक्रीस परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यापासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. आठवड्यापूर्वी लॉटरी दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्याने लॉटरी विक्री व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यंदा गुढीपाडव्याचा मोठा ‘ड्रॉ’ ( सोडत) रद्द करण्यात आला. महाराष्ट्र राज्य लॉटरीचे दरमहा महाराष्ट्र सह््याद्री, गौरव, गणेशलक्ष्मी हे तीन मोठे  ‘ड्रॉ’ असतात. निर्बंध शिथिल झाल्यानंतर  एप्रिलमध्ये रद्द झालेल्या ‘ड्रॉ’ च्या तिकिटांची विक्री करण्यास पनवेल येथील  शासकीय लॉटरी कोषागाराकडून परवानगी देण्यात आली आहे. जुनीच तिकिटे विकण्यास परवानगी देण्यात आली असून २७ जूननंतर गुढीपाडव्यासह प्रमुख ‘ड्रॉ’ चे निकाल लागणार आहेत, असे मॅजेस्टिक लॉटरी स्टॉलचे राहुल कोठावळे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. गेल्या वर्षी गणेशोत्सवात लॉटरी तिकिटांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली होती. लॉटरी व्यवसाय सुरळीत होण्यास आणखी एक महिन्याचा कालावधी लागेल, असे त्यांनी नमूद केले.

परराज्यातील निकाल लवकरच

पंजाब, पश्चिम बंगाल, सिक्कीम येथील लॉटरी तिकिटांना राज्य लॉटरींच्या तुलनेत मोठे बक्षीस असते. तेथेही करोनाचा संसर्ग वाढीस लागल्याने लॉटरी तिकीट विक्रीवर निर्बंध घालण्यात आले होते. परराज्यातील लॉटरींच्या जुन्या  ‘ड्रॉ’ ची सोडत जून महिन्यात काढण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्य लॉटरीच्या तुलनेत परराज्यातील लॉटरी तिकिटे काढण्याचा ओढा वाढला आहे.

सर्वाधिक लॉटरी मुंबईत

परराज्यातील ऑनलाइन लॉटरी व्यवसायामुळे काही अनिष्ट  प्रकार सुरू झाले आहेत. पन्नास पैशांपासून लॉटरी तिकिटांची विक्री सुरू झाली. पुणे-मुंबईतील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक आजही आवर्जून राज्य लॉटरीची तिकिटे काढतात. पुण्याच्या तुलनेत मुंबईत तिकिटे काढण्याचे प्रमाण जास्त आहे. त्या खालोखाल कोल्हापूर, सांगली, नागपूर या शहरात मोठ्या प्रमाणावर राज्य लॉटरीची तिकिटे काढली जातात. आजपर्यंत राज्य लॉटरीची सर्वाधिक बक्षिसे मुंबईतील तिकीटधारकांना मिळाली आहेत.

राज्य लॉटरीचा इतिहास

१९६० च्या दशकात राज्यात बेकायदा मटका मोठ्या प्रमाणावर फोफावला होता. त्यातून राज्य  शासनाला कोणताही कर किंवा उत्पन्न मिळत नव्हते. १९६५ मध्ये के. व्ही. कोठावळे यांनी अधिकृत लॉटरी व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. १९६७ मध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू झाली. राज्य लॉटरीचे प्रमुख वितरक म्हणून कोठावळे कुटुंबीयांनी जम बसवला. कालांतराने नवीन व्यवसाय सुरू केले. सध्या मी आणि आमच्या कुटुंबातील  गिरगावमधील सचिन कोठावळे लॉटरी व्यवसायात आहोत. राज्य लॉटरीच्या विक्रीमुळे  कोठावळे कुटुंबीयांची ओळख संपूर्ण राज्याला झाली आहे, असे राहुल कोठावळे यांनी सांगितले.