पिंपरी-चिंचवड शहरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले असून, रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. यातून अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे. दरम्यान, गल्लीमध्ये सायकल खेळण्यास ही बंदी घालण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बाहेरून येणाऱ्या वाहनांना मज्जाव करण्यात आला असून त्यांना शहरात प्रवेश नाकारण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १२ करोना बाधित रुग्ण आढळले असून, त्या पार्श्वभूमीवर आता जमावबंदीसह शहरातील अंतर्गत सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. यात पीएमपीएमएल बसेसचाही समावेश आहे. मध्यरात्री १ वाजल्यापासून हा आदेश लागू करण्यात आला असून ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहे. सर्व प्रकारच्या वाहनांना रस्त्यावर, तर गल्ल्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या सायकल तसेच पारंपरिक व अपारंपरिक इंधनावर चालणाऱ्या मोटार सायकल, स्कूटर, सर्व प्रकारची वाहतूक करणारी तीनचाकी वाहने, हलकी वाहने, जड-अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे पालन न केल्यास कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल असं ही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.