राज्यभरात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. दरररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत व करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडतच आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर व औरंगाबाद या प्रमुख शहरांसह विदर्भातील अनेक शहारांमध्ये करोना रुग्ण आढळून येत आहे. आज दिवसभरात पिंपरी-चिंचवड शहरात ११ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २५३ तर महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरील ३ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, २९२ जण करोनामुक्त झाले आहेत. चिंताजनकबाब म्हणजे दिवसभरात ११ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ५ हजार ९५७ वर पोहचली आहे. यापैकी, १ लाख ६८४ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार १४१ असल्याची अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

तर, पुणे शहरात आज दिवसभरात ४०६ नवीन करोनाबाधित वाढले असून, चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या आता २ लाख ३ हजार १०८ झाली आहे. तर, ४ हजार ८५९ रुग्णांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ४१५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजअखेर १ लाख ९३ हजार ३४३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, राज्यातील करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. मागील तीन दिवसातील दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही ८ हजारांच्या वर आढळून आल्यानंतर, आज यामध्ये काहीशी घसरण झाल्याचे दिसून आले. शिवाय करोनातून बरे होणाऱ्यांची संख्येत देखील वाढ दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ६ हजार ३९७ नवीन करोनाबाधित आढळून आले, तर ५ हजार ७५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. याशिवाय राज्यात आज ३० रुग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.

Coronavirus – राज्यात आज ६ हजार ३९७ नवे करोनाबाधित; ५ हजार ७५४ रुग्ण करोनामुक्त

राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ३० हजार ४५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९३.९४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यातील मृत्यूदर २.४१ टक्के आहे.