पुणे शहरात आज दिवसभरात ३७३ नवे करोनाबाधित आढळले. तर, १६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. याचबरोबर पुण्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ६१ हजार ३३४ वर पोहचली. तर, आजअखेर ४ हजार २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ३५० रुग्णांची तब्येत ठीक झाल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर एकूण १ लाख ५१ हजार ४९५ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

तर, पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १६६ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, २३२ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८७ हजार ७४० वर पोहचली असून. यापैकी, ८४ हजार ४७८ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८५९ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही सातत्याने अधिक आढळत आहे. आज दिवसभरात ७ हजार ३०३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८९.९९ टक्क्यांवर पोहचले आहे. आजपर्यंत राज्यात एकूण १५ लाख १० हजार ३५३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

याशिवाय, आज दिवसभरात राज्यात ५ हजार ५४८ नवीन करोनाबाधित आढळले. तर, ७४ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.६२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९ लाख ६७ हजार ४०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ७८ हजार ४०६ (१८.७२ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत.