राज्यभरातली करोना संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ सुरू आहे. शिवाय, दररोज होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. आज दिवसभरात पुणे शहरात १ हजार ८०५ करोनाबाधित वाढले, तर ८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी पुणेकरांसह प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे.

शहरातील एकूण बाधितांची संख्या आता २ लाख १४ हजार ८३० झाली आहे. तर आजपर्यंत ४ हजार ९२५ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, आज ५९८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख १६५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ८५५ नवीन करोनाबाधित –

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ८५५ तर महानगर पालिकेच्या हद्दी बाहेरील ३ जण करोनाबाधित आढळले, तसेच चार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याशिवाय ४७६ जण करोनामुक्त देखील झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख १२ हजार ३७० वर पोहचली आहे. यापैकी, १ लाख ४ हजार ३६६ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार २७५ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुण्यात लॉकडाउन? अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर विभागीय आयुक्तांची महत्वाची माहिती

राज्यात करनोाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक  जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात हॉटस्पॉट ठरणाऱ्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पुण्याचाही समावेश आहे. त्यामुळे पुण्यातही नव्याने निर्बंध लागू केले जाणार का? याबाबत चर्चा सुरु होती. पुण्यातील करोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आज(शुक्रवार) पुण्यात पोहोचले होते. अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत  पुण्यात करोनासंदर्भात कोणतेही नवे निर्बंध लागू करण्यात आले नसल्याची माहिती दिली आहे.