शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य यंत्रणेच्या सुसज्जतेकडे भर दिला असून यासाठी महापौर विकास निधी आणि आरोग्य निधीतून ४ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. उपचार करताना आवश्यक असलेल्या साहित्यासाठी दोन रुग्णवाहिकांची खरेदी यातून तातडीने होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असताना आवश्यक साहित्य मुबलक आणि नजीकच्या भविष्याचा विचार करता उपलब्ध असावे, यासाठी महापौर मोहोळ यांनी स्वतःच्या निधीतून तातडीने रक्कम उपलब्ध करून दिलेली आहे.
या संदर्भात महापौर मोहोळ म्हणाले, ‘उपलब्ध केलेल्या महापौर विकास निधीतून २ हजार ५०० पीपीई किट्स, ८ स्वाब बूथ, १०० इन्फ्रारेड थर्मामीटर आणि ९ हजार २०० एन. ९५ मास्क खरेदी केले जाणार आहेत. तर महापौर आरोग्य निधीतून २ रुग्णवाहिका आणि १७ थर्मल स्कॅनर बसवण्यात येणार आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असताना यंत्रणा कमी पडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.’
कोरोनाग्रस्तांसाठी खास रुग्णवाहिका !
महापौर आरोग्य निधीतून खरेदी होत असलेल्या दोन रुग्णवाहिकांमधून रुग्णांना डॉ. नायडू रुग्णालयातून सिम्बॉयोसिस आणि भारती हॉस्पिटलमध्ये ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 8:33 pm