पुणे शहरात दिवसभरात ६ हजार २२५ करोनाबाधित वाढले असून, ४१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या आता २ लाक ९० हजार ४४ झाली आहे. तर, आजपर्यंत ५ हजार ४५२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ३ हजार ७६२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर आजअखेर २ लाख ४२ हजार ६५२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ३ हजार ३८२ करोनाबाधित आढळले असून, महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरील १३ जण बाधित आढळले आहेत. तर, १ हजार ७९१ जण करोनामुक्त झाले आहेत. याचबरोबर १८ रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ५० हजार ९२८ वर पोहचली आहे. यापैकी, १ लाख २६ हजार ६३५ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ५४३ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

ठरलं! महाराष्ट्रात कठोर निर्बंध; शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन

मागील काही दिवसांत करोनानं अक्षरक्षः थैमान घातल्यानं राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरूवात झाली असून, रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी सुरू होती. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन व अन्य दिवस कडक निर्बंध लागू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.