राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही शहरं यामध्ये आघाडीवर आहेत. आज पुणे शहरात दिवसभरात 93 करोना बाधित रुग्ण आढळले. आता शहराची 1611 रुग्ण संख्या झाली आहे.  तर आज 6 जणांचा मृत्यू झाला असून एकूण आतापर्यंत 92 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 14 दिवसानंतर निगेटिव्ह रिपोर्ट आल्याने आज 51 जणांना, तर आज अखेर 325 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे विभागात मागील काही दिवसांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आज पुणे विभागात एकाच दिवसात 81 रुग्ण आढळले आहे. तर त्याच दरम्यान 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. तसेच विभागात  1 हजार 986 इतकी करोना बाधित रुग्णांची संख्या झाली असून आतापर्यंत एकुण 109 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात २४ तासात १००८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ही आता ११ हजार ५०६ इतकी झाली आहे. आज १०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत १८७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. त्यापूर्वीच पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारनं  लॉकडाउनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सर्व राज्यांमधील करोनाग्रस्तांची माहिती आणि त्याची समीक्षा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या लॉकडाउन दरम्यान रेड झोनमधील कोणत्याही भागांना सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.