करोना विषाणूमुळे जगभरात हजारो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या विषाणूंमुळे पुण्यात देखील आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला असून, अशा रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकपुढे येत नसल्याचे चित्र आहे. अशांवर प्रशासनामार्फत अंत्यसंस्कार केले जात आहेत. तर आता पुण्यातील मूल निवासी मुस्लीम मंचाने देखील अशा मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

यावेळी मूल निवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार म्हणाले की, करोनामुळे मृत्यू होणार्‍या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास घरातील कोणी पुढे येत नाही. त्यामुळे आता आपणच पुढे येऊन हे कार्य करण्याचा निर्णय घेतला आणि पुणे महापालिकेसोबत पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर या कामास परवानगी देखील मिळाली.

त्यानुसार आजपर्यंत 4 मृतांवर अंत्यसंस्कार केले असून आम्ही प्रत्येक धर्माच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करीत आहोत. हे कार्य करीत असताना एकच वाटते की, मृतांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता अंत्यसंस्कार करण्यास पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.