जगभरासह देशभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा रोज वाढतानाच दिसतो आहे. पुण्यातील ससून रूग्णालयात आज ४६ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या महिलेचा करोना बाधित झाल्याचा रिपोर्ट आला होता. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ४१६ झाली आहे. एकीकडे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. अशात पुण्यात आणखी एक बळी गेल्याची बातमी समोर आली आहे.

राज्यभरात आतापर्यंत ८१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या थेट ४१६ झाली आहे. पुण्यात सहा, पिंपरी चिंचवडमध्ये तीन, मुंबईत ५७, अहमदनगरमध्ये नऊ, ठाण्यात पाच, बुलढाण्यात १ असे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या ४१६ वर गेली आहे. महाराष्ट्राच्या काळजीत भर घालणारी ही बातमी ठरली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत ४२ रुग्णांना डिस्चार्ड देण्यात आला आहे असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर संपूर्ण देशही लॉकडाउन करण्यात आला आहे. देशात करोना रुग्णांची संख्या २ हजारांच्या वर गेली आहे.

करोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ करोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून २ हजार ३०५ खाटा करोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.

या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि करोना निदान झालेल्या रुग्णांना  केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे.