पुण्यामध्ये दोन करोनाचे रुग्ण अढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी याच पार्श्वभूमीवर पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पुण्यातील डॉक्टरांना एक आवाहन केलं आहे.

म्हैसकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना डॉक्टरांना आव्हान केलं की रुग्ण तुमच्याकडे आल्यास ते नुकतेच परदेशात जाऊन आले आहेत का याची माहिती घ्या. “इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही पुण्यातील डॉक्टरांना आवाहन करु इच्छितो की तुमच्याकडे कोणी रुग्ण आल्यास त्यांनी परदेश दौरा केला आहे का याची माहिती घ्या. तसेच सर्दी, ताप, शिंक येणे, खोकला किंवा शरीराचे तापमान वाढल्याचे चिन्ह रुग्णांमध्ये दिसल्यास त्या रुग्णांवर त्यांच्या स्तरावर उपचार करण्याऐवजी नायडू रुग्णालयात पाठवावे असं आम्ही आवाहन करतो. या रुग्णांना नायडू रुग्णालयात पाठवल्यास त्यांच्या रक्ताचे नमूने घेऊन ते करोनाच्या चाचणीसाठी पाठवण्यात येतील,” असं म्हैसकर म्हणाले.

पुण्यातील ते दोन रुग्ण कोण? 

पुण्यामध्ये करोना झालेले दोन्ही रुग्ण १ मार्च रोजी दुबईमधून भारतात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांना ८ मार्च रोजी त्रास होऊ लागल्याने ते चाचणीसाठी नायडू रुग्णालयात आले. तेथे त्यांच्या रक्तांचे नमुने घेण्यात आले त्यात त्यांना करोना झाल्याचे सिद्ध झालं असं म्हैसकर म्हणाले.

नक्की वाचा >> Coronavirus: ‘तो’ टॅक्सी चालकही नायडू रुग्णालयात देखरेखीखाली

नायडू रुग्णालयामध्ये तयार करण्यात आलेल्या विशेष आयसोलेशन वॉर्डमध्ये या दोघांना दाखल करण्यात आलं आहे. या दोघांनाही २० फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारीदरम्यान दुबई दौरा केला होता. हे दोन्ही रुग्ण १ मार्च रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. तेथून ते ओला टॅक्सीद्वारे पुण्याला आले. या टॅक्सी चालकाची ओळख पटली असून त्यालाही नायडू रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलं असल्याची माहिती म्हैसकर यांनी दिली आहे.