बारामतीमध्ये करोना व्हायरसने शिरकाव केला असून एका रिक्षाचालकाला संसर्ग झाला आहे. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सर्दी, ताप, खोकला आदी त्रास झाल्याने रिक्षाचालकाने येथील एका खासगी रूग्णालयात प्राथमिक उपचार घेतले. पण प्राथमिक उपचारानंतरही सर्दी-ताप-खोकला कमी न झाल्यानं त्याला पुण्यातील ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. ससून रूग्णालयातून त्याला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे करण्यात आलेल्या तपासणीत कोरोनाची त्याला बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

या रिक्षाचलकाने बारामतीमध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये विविध ठिकाणी प्रवास केला आहे. तसेच अनेकांच्या तो संपर्कातही आला होता. दररोज शेकडो प्रवाशांची त्यानं नेआण केली होती. या रिक्षाचालकामुळे बारामतीमधील अनेक लोकांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बारामती शहरातील श्रीरामनगर हे केंद्र धरुन 3 किमी परिसर कॉरनटाईन झोन म्हणून व तेच केंद्र धरुन 5 किमी परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्या क्षेत्रात सर्व प्रकारची वाहतुक नियंत्रित करण्यात येत आहे. बारामतीकरांनी बाहेर फिरू नये घरातच राहावे. सर्वांनी मिळून पुढील काही कालावधीसाठी स्वतःहुन जनता कर्फ्यू लागू करून स्वतःहुन सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी कांबळे यांनी केले आहे.

दरम्यान, करोना व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस देशात वाढतच आहे. महाराष्ट्र याबाबतीत अव्वल आहे. त्यात मुंबई खालोखाल पुणे शहराचा क्रमांक लागत आहे. रविवारी (29 मार्च) दिवसभरात शहरात करोनाची बाधा झालेले चार रुग्ण आढळले असून पुण्याची करोना बाधित रुग्णांची संख्या आता 28 झाली आहे.