महाराष्ट्रात करोनाचा उद्रेक झाला तो पुण्यात. पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही तब्बल आठ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. झपाट्यानं संसर्ग होत असलेल्या करोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारनं तातडीचा उपाय म्हणून गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश काढला. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना आदेशाचा विसर पडला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यामधील एकून करोनाग्रस्तांचा आकडा १५ वर पोहचला आहे. करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक करोनाबाधित आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून राज्य शासनाने शाळा, कॉलेज, जलतरण तलाव, जिम, मॉल्स आदी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या व्यतिरिक्त कोणताही कार्यक्रम घेऊ नये असेही आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून गर्दी होणार नाही. मात्र, आज पिंपरी-चिंवडमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. याबैठकीला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. करोनाचा संसर्ग वेगानं फैलावत असताना भाजपाच्या प्रदेशांकडूनच राज्य शासनाचा आदेश भंग केल्याचं दिसत आहे.

सध्या पुण्यात १५ करोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत १६ जणांना घरी सोडण्यात आलं आहे. मात्र, संसर्गाचं प्रमाण कमी झालेलं नसल्यानं प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. आजच (१५ मार्च) राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका शाळेच्या इमारतीचं उद्घाटन केलं. त्याची चर्चा सुरू असतानाच भाजपाच्या बैठकीचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे राज्यात करोनाला रोखण्यासाठी प्रयत्न होत असताना राजकीय नेत्यांकडूनच बेजबाबदारपणाचं दर्शन होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.