कृष्णा पांचाळ

सध्या व्हाट्सअॅपवर एक व्हिडीओ व्हायरल होत असून एक दोन वर्षाचा चिमुरडा बाबा बाहेर जाऊ नका बाहेर करोना आहे असं म्हणत टाहो फोडत आहे. दरम्यान, व्हिडिओमधील चिमुरड्याचे अभय असे नाव असून माणिक घोगरे असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. ते सध्या पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या सर्वत्रच करोनानं थैमान घातलं आहे. यावर मात करण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरून नागरिकांना बाहेर पडू नका असे आवाहन करत आहेत. त्यातच अनेकदा पोलिसांना आपल्या कुटुंबीयांच्या अशा मागणीकडे दुर्लक्ष करावं लागत आहे. पोलिसांच्या कुटुंबातील या छोट्या चिमुरड्यानेदेखील याची धास्ती घेतली आहे.

अवघ्या महाराष्ट्रासह देशात रस्त्यांवर केवळ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हेच दिसत आहे. वारंवार नागरिकांना घराबाहेर पडू नका असं आवाहन केले जात आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्भभूमीवर पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या मुलाचा एक भावनिक व्हिडीओ व्हायरल होत आहे. माणिक घोगरे यांनी काही दिवसांपूर्वी रजा घेतली होती. त्यामुळे ते कुटुंबासोबत चांगलेच रमले होते. टिव्ही पाहात असताना करोना विषयी सतत बातम्या येत होत्या आणि त्या त्यांच्या मुलानंही पाहिल्या. तेव्हा दोन वर्षांच्या चिमुरड्याने वडिलांना करोना कोण आहे असं विचारलं असता हा राक्षस असून बाहेर गेल्यानंतर तो मारतो असे वडिलांनी उत्तर दिले.

दरम्यान, माणिक घोगरे यांची रजा संपल्यानंतर ते कर्तव्य बजावण्यासाठी जात होते. तेव्हा अचानक चिमुरड्या अभयने टाहो फोडत बाबा बाहेर जाऊ नका बाहेर करोना आहे असं म्हणत त्यांना न जाण्याची विनंती केली. त्यांनी हा व्हिडीओ मोबाईलमध्ये घेतला आणि कौतुकासाठी मित्रांना पाठवला. त्यानंतर हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. करोना हा खरच राक्षस आहे आणि तो आपल्या जीवावर उठला आहे हे खरं आहे. त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये.