रुग्णांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी; मात्र खबरदारी आवश्यकच

पुणे : मार्च महिन्यापासून करोना विषाणू संसर्गाचे देशातील एक केंद्रस्थान म्हणून पुणे शहर चर्चेत आहे. सप्टेंबपर्यंत धडकी भरवणाऱ्या करोनाने ऑक्टोबरमध्ये मात्र पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. रोज नव्याने आढळणारे रुग्ण आणि बरे होणारे रुग्ण यांच्या संख्येतील तफावत यंत्रणा आणि नागरिकांवरील दडपण कमी करत आहे. रुग्ण कमी होत असले, तरी नागरिकांनी गाफील न राहता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन सर्वच यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

सप्टेंबर महिन्याच्या अखेपर्यंत पुणे शहरात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या रोज १५०० ते २००० च्या घरात होती. दररोज दगावणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी होती. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली. चार ऑक्टोबरला सर्वप्रथम दैनंदिन नोंद होणारी रुग्णसंख्या एक हजारपेक्षा कमी झालेली पाहायला मिळाली. १२ ऑक्टोबरनंतर दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या पाचशेपेक्षा कमी झालेली पाहायला मिळाली. १९ ऑक्टोबरला शहरात २१४ तर २० ऑक्टोबरला ३२८ नवे रुग्ण आढळले आहेत. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच रोज दगावणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून करोना प्रतिबंध आणि उपचारांसाठी कार्यरत असलेल्या आरोग्य यंत्रणांवरचा ताण कमी झाला आहे.

महापालिके चे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांच्या चाचण्याही साहजिकच कमी झाल्या आहेत, त्यामुळे चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली असे म्हणता येणार नाही. प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या (अ‍ॅक्टिव्ह) रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आले आहे. रुग्णालयांमध्ये ५० टक्के  खाटा रिकाम्या आहेत. नागरिक आणि यंत्रणांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे. मात्र, म्हणून गाफील राहणे चुकीचे ठरेल. सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत. या काळात नागरिकांनी संपूर्ण खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. वावरे यांनी स्पष्ट के ले.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, महामारीसारख्या परिस्थितीत एक वेळ रुग्णसंख्येचे असे सपाटीकरण होणे नैसर्गिक आहे यात शंका नाही. मात्र, चाचण्या कमी झाल्यामुळेही रुग्णसंख्येत ही घट दिसत आहे, असे निरीक्षण आहे. लक्षणे नसलेल्या वाहकांकडून आजार पसरत राहाण्याची शक्यता अद्यापही मोठी आहे, हे नागरिकांनी लक्षात ठेवावे. प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र, प्रतिबंधित वगळता इतर क्षेत्रांमध्ये अद्याप रुग्ण आढळत आहेत. नागरिकांची खबरदारी आणि प्रशासनाचे प्रतिबंधात्मक उपाय या दोन्हींचे समान योगदान यापुढील काळात दिसणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट के ले.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी

’ मुखपट्टीचा वापर अनिवार्य आहे, हे नागरिकांनी लक्षात ठेवावे.

’ गर्दीची ठिकाणे टाळणे हा प्रमुख प्रतिबंधात्मक उपाय पाळावा.

’ सणासुदीच्या काळात परस्परांना भेटणे, खरेदीसाठी बाहेर पडणे टाळावे.

’ कोणत्याही प्रकारचे दुखणे अंगावर न काढता डॉक्टरांना भेटावे.

’ घर, परिसर आणि वैयक्तिक स्वच्छता राखावी. हात वारंवार धुवावेत.

तारीख        नवे रुग्ण       मृत्यू         बरे होऊन घरी               उपचार सुरू      

                                                         गेलेले रुग्ण                 असलेले रुग्ण

१ ऑक्टो       १०३६         ४२                        ११७०                   १६,३६९

१० ऑक्टो      ७०३          २२                         १११७                   १३,३००

२१ ऑक्टो      ४२८          २३                           ७५८                    ८२४८