सध्या करोना विषाणूने जगभरासह देशभरात थैमान घातलं आहे. राज्यातही करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई व पुणे हे दोन्ही प्रमुख शहरं यामध्ये अग्रस्थानी दिसत आहेत. या शहरांमधील करोनाबाधितांची व मृत्यूची संख्या वाढतच आहे. आज पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आईला करोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या संवाद साधला असता ते म्हणाले,  आमच्या पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आईला करोनाची बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. मात्र या नंतर संबधित कर्मचाऱ्याची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या 1 हजार 666 वर पोहचली आहे. तर एकट्या पुणे जिल्ह्यात हा आकडा 236 वर पोहचला आहे. रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या देशासाठी चिंतेची बाब ठरत आहे. पंतप्रधानासंह देशभरातील प्रशासन करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.