राज्यातील करोनाचा केंद्रबिंद ठरलेल्या पुण्यात वेगळीच घटना समोर आली आहे. करोनाग्रस्त रुग्णांच्या घरातील एका दाम्पत्याला डिस्चार्ज दिल्यानंतर करोना असल्याचं निष्पन्न झालं आहे. करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयानं या दाम्पत्याचे नमुने घेतले होते. मात्र, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. घरी सोडण्यात आल्यानंतर या दाम्पत्याला करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

राज्यात सर्वप्रथम पहिला करोनाचा रुग्ण पुण्यात सापडला. त्यानंतर करोनानं राज्यात हातपाय पसरले. याच पुण्यातून एक चिंता वाढवणारी घटना घडली आहे. शहरातील ससून रुग्णालयात एका वृद्ध महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. या वृद्ध महिलेच्या संपर्कात तिचा मुलगा आणि गर्भवती सून आली होती. रुग्णालयानं त्या दोघांचे चाचणीसाठी नमुने घेतले. मात्र, त्यांना विलगीकरण कक्षात न ठेवता संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देण्यात आलेल्या या दाम्पत्याला करोना असल्याचं नंतर आलेल्या रिपोर्टमधून समोर आलं. मात्र, त्याआधीच त्यांना सुटी दिल्यानं काहीशी चिंता वाढली आहे.

आणखी दोघांचा मृत्यू –

पुण्यातील संगमवाडी परिसरातील एका ५८ वर्षीय महिलेसह सोमवार पेठेतील एका ५६ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही महिलांना अन्य आजारांनी देखील ग्रासले होते असे देखील सांगण्यात आले आहे. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्यात आतापर्यंत करोनामुळे ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या ३१ रुग्णांपैकी आज २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात आज १३४ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्ण संख्या १८५९ वर पोहचली आहे.