गर्दीवर नियंत्रणासाठी वकिलांचा पुढाकार

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : करोनाचा संसर्ग पुन्हा वाढीस लागल्याने धर्मादाय कार्यालयात उडालेली झुंबड पाहून अखेर वकिलांनी पुढाकार घेतला. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करणाऱ्या धर्मादाय आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांवर ताण पडल्याने आता वकिलांनी तपासणी करण्याचे काम सुरू केले आहे.

आठवडय़ाची सुरुवात झाल्याने धर्मादाय कार्यालयात गर्दी होत आहे. एका प्रकरणासाठी तीन ते चार पक्षकार प्रत्यक्ष कार्यालयात येत आहेत. सुनावणीची पुढील तारीख मिळवण्यासाठी पक्षकार गर्दी करत आहेत. धर्मादाय कार्यालयात एकूण मिळून पाच न्यायालये आहेत. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची तापमापकाद्वारे तपासणी तसेच नोंदणी करून प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, प्रवेशद्वारावर झुंबड उडत असल्याने तपासणी करणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर ताण वाढलेला आहे. त्यामुळे पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन या वकिलांच्या संघटनेने पुढाकार घेऊन कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी सुरू करण्याचे काम हाती घेतली आहे.

वकील संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. मोहन फडणीस यांनी स्वत: पुढाकार घेऊन प्रत्येकाची तापमापकाद्वारे तपासणी सुरू केली आहे. अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश परदेशी यांनी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची नोंदणी करण्याचे काम हाती घेतले आहे. प्रवेशद्वारावर होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी अ‍ॅड. हेमंत फाटे, अ‍ॅड. विजय टिळेकर आणि सहकारी प्रत्येकाला सूचना देत आहेत. जंतुनाशकांचा वापर तसेच मुखपट्टीचा वापर करणाऱ्या पक्षकारांना कार्यालयात प्रवेश देण्यात येत आहे. कार्यालयाच्या आवारातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी वकिलांकडून पुढाकार घेण्यात आला आहे.

धर्मादाय कार्यालयात आवश्यक ता नसेल तर गर्दी करू नका. करोनाचा संसर्ग पुन्हा वाढीस लागल्याने प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.

– सुधीरकुमार बुक्के, सहधर्मादाय आयुक्त 

सर्वाच्या हितासाठी नियम

कामामुळे प्रत्येकाला बाहेर पडावे लागते. सरकारी कार्यालयात काम घेऊन येणाऱ्या प्रवेश नाकारता येत नाही. मात्र, करोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. वकील, न्यायालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष आघाडीवर काम करणारे घटक म्हणून करोना लस देण्याची गरज आहे, असे पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्सचे विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम-जहागीरदार यांनी सांगितले.