पिंपरी-चिंचवड शहरात तीन दिवसांत करोना आजारापासून मुक्त झालेल्या एकूण ९ व्यक्तींना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे शहरात आता केवळ तीनच करोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि भोसरीमधील नूतन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री दहाच्या सुमारास एका व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आजवर शहरात १२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

पिंपरी-चिंचवडसह राज्यात करोना विषाणूने थैमान घातले. शहरात १२ करोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती शहर आणि राज्यात वाऱ्यासारखी पसरली. मात्र, डॉक्टरांनी परिश्रम घेतल्याचे स्पष्ट दिसत असून गेल्या तीन दिवसांमध्ये ऐकून ९ जणांना ठणठणीत बरं केलं आहे. या १२ रुग्णांपैकी रविवारी सकाळी पाच जणांना तर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला. रात्री डिस्चार्ज दिलेली व्यक्ती ही जपानच्या टोकियो शहरातून आली होती. करोनाची बाधा असल्याचं निष्पन्न झाल्यांतर भोसरी येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.

लॉकडाऊनमुळे संसर्ग नियंत्रणात

दरम्यान, या व्यक्तीच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या असून त्याला घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांचा संख्या अवघ्या तीनवर येऊन ठेपली आहे. सुरुवातीला हीच आकडेवारी भीतीदायक होती. लॉकडाऊननंतर शहरातील करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात एकही रुग्ण आढळलेला नाही. प्रशासन आपली भूमिका चोख बजावत असल्याचा हा परिणाम आहे.