राज्यात लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे बेघर, गोरगरिबांचे खाण्यापिण्याचे मोठे हाल होत आहेत. ही बिकट परिस्थिती लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरातील आयटी आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या तरुणांनी लॉकडाउनच्या काळात गेल्या १३ दिवसांमध्ये तब्बल ५ हजार गरिबांना जेवण पुरवले आहे. ६० तरुणांनी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एकत्र ही कामगिरी केली.

काही तरुणांनी एकत्र येऊन दोन वर्षांपूर्वी ‘थेरगाव सोशल फाउंडेशन’ नावाची एक सामाजिक संस्था उभी केली. या माध्यमातून अनेक गरजूंना त्यांनी आजवर मदत केली आहे. अनिकेत प्रभु, राहुल सरवदे, निलेश पिंगळे, अनिल घोडेकर यांच्यासह ६० तरुण या सेवाभावी कार्यासाठी एकत्र आले आहेत. गेल्या १३ दिवसांमध्ये त्यांनी तब्बल ५ हजार भुकेल्या नागरिकांना पोटभर जेवण देण्याचं काम केलं आहे. जेवण देत असताना सोशल डिस्टसिंगच्या मूलमंत्राचे देखील त्यांनी पालन केले आहे. राज्यातील लॉकडाऊनसंपेपर्यंत या गरिबांना आपण जेवण पुरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माझा समाज, माझी जबाबदारी

थेरगाव आणि काळेवाडी भागातील ५ हजार गरीब भुकेल्या नागरिकांना हे तरुण आपल्या संस्थेमार्फत जेवण देत आहेत. यामध्ये पुलाव, बिर्याणी, खिचडी आशा अन्न पदार्थांचा समावेश आहे. यापूर्वी या तरुणांनी एकत्र येत गोरगरिबांसाठी विविध प्रकारच्या गरजेच्या वस्तूंचे वाटपही केले आहे. लॉकडाऊनसंपेपर्यंत अर्थात १४ एप्रिलपर्यंत अविरतपणे हे काम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘माझा समाज, माझी जबाबदारी’ अशी जाणीव ते लोकांना करून देत आहेत.