पुण्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीस केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांची देखील उपस्थिती होती. बैठकीनंतर जावडेकर यांनी माध्यमांशी संवाद साधून बैठकीत ठरलेल्या विस्तृत कार्यक्रमाबाबत माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मला कळतंय, काहींच्या सहनशीलतेचा अंत झालाय, पण…” करोनाबाबत अजित पवारांचं जनतेला आवाहन!

जावडेकर म्हणाले, “पुणेकर जनतेने आज जनता कर्फ्यू सारख्या भावनेने करोना कर्फ्यूचं अतिशय उत्तम पालन केलं. या बद्दल पुणेकर जनतेला निश्चत धन्यवाद दिले पाहिजे. कारण, करोनाची साखळी तोडण्यासाठी हे जे उपाय योजले जात आहेत, त्यांचं आपण पालन केलं पाहिजे, ही त्यामध्ये भावना आहे. सगळ्या मोठा प्रश्न व्हेंटिलेटर्स संदर्भात होता. मी आज केंद्रातील सर्व संबंधित अधिकरी, मंत्र्यांशी बोलणं केलं. त्यामुळे लगेच ११२१ व्हेंटिलेटर्स महाराष्ट्रासाठी पुढील तीन-चार दिवसांत इथं दाखल होतील. यातील ७०० गुजरातमधून व ४०० आंध्र प्रदेशमधून येत आहेत. ऑक्सिजन देखील औद्योगिक उत्पादन जिथं होतं तिथून, ऑक्सिजन मिळण्यासाठी देखील केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्य करणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे मनुष्यबळ टेस्टिंग, ट्रॅकींग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटसाठी लागणार आहे. ते मनुष्यबळ घेण्यासाठी नॅशनल हेल्थ मिशनमधून केंद्र सरकार पैसे देणार आहे. कारण, आम्ही असं मानतो हे राष्ट्रीय संकट आहे. सगळी राज्य सगळी जनता आमचीच आहे. त्यामुळे जिथे परिस्थिती गंभीर आहे तिथे जास्त लक्ष आणि उपाय अशा स्वरूपाचं धोरण आहे. आता केंद्राच्या ३० टीम या महाराष्ट्रात आलेल्या आहेत. या ३० टीम विविध जिल्ह्यांमधील परिस्थितीचा आढावा घेऊन आणखी काय करायला हवं? यासंबंधीचा अभिप्राय त्यांनी तयार केलेला आहे. पुण्यात देखील टीम आलेली आहे.”

प्रकाश जावडेकर म्हणतात, “लस पुरवठा पुरेसा, पण महाराष्ट्र सरकारच काम नीट करत नाही!”

तसेच, “माझ्याकडे काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचा देशभराचा अहवाल आहे. यामध्ये महाराष्ट्राला १ कोटी १० लाख एवढे डोस महाराष्ट्राला मिळाले आहेत. १ कोटींपेक्षा अधिक केवळ तीन राज्यांनाच मिळाले आहेत. राजस्थान, गुजरात व महाराष्ट्र. त्यापैकी ९५ लाख कालपर्यंतचे आहेत, कारण आज थोड आणखी वाढले आहेत. १५ लाख ६३ हजार वॅक्सीन शिल्लक आहेत. हा अहवला सर्व राज्यांना माहिती आहे. त्यामुळे यांचं नीट वाटप झालं पाहिजे. म्हणजे वॅक्सीन संपली असं कुठंही सांगितलं जाणार नाही.” असं देखील यावेळी जावडेकर यांनी बोलून दाखवलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus important information given by javadekar after the review meeting in pune said msr
First published on: 10-04-2021 at 17:57 IST