पुणे शहरात करोनाचा प्रादुर्भाव अत्यंत झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने पाचशे पेक्षा अधिक नवे करोबाधित रुग्ण वाढत आहेत. शिवाय, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात पुण्यात करोनामुळे २१ रुग्णांचा मृत्यू झाला. तर ६४० नवे करोना रुग्ण वाढले आहेत.

शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता २३ हजार २१ एवढी झाली आहे. आजपर्यंत करोनामुळे ७५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, करोनावर उपचार घेणार्‍या ६७२ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना आज घरी सोडण्यात आले. त्यामुळे आज अखेर १४ हजार ४११ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज ३५२ करोनाबाधित रुग्ण आढळले असून ५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर २३२ जण करोनामुक्त झाले असून आत्तापर्यंत ३ हजार १३८ जण करोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत १०४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधितांची संख्येने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५ हजार २०३ वर पोहचली आहे.