पुणे शहरात दिवसभरात ६८८ करोनाबाधित रुग्ण आढळले असुन, पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर एकूण बाधितांची संख्या आता २ लाख ३ हजार ७९६ इतकी झाली आहे. तर, आजपर्यंत ४ हजार ८६४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान आज ४९८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजअखेर १ लाख ९३ हजार ८४१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी शहरातील लसीकरण केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला.  राज्य शासनाकडून अद्याप सूचना आली नसल्याचा दावा, यंत्रणेची तयारी नसल्याचे स्पष्ट चित्र, सव्‍‌र्हरमुळे निर्माण झालेले प्रश्न आणि कोविन अ‍ॅपवर नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी अशा सावळ्या गोंधळानंतर शहरात काल (सोमवार) दुपारी दोनपासून लसीकरणाला सुरुवात झाली. लस टोचून घेण्यासाठी करावी लागलेली दीर्घकाळ प्रतीक्षा आणि सहन करावा लागलेला मनस्ताप यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या रागाचा पारा चढला होता. दिवसभरात महापालिकेच्या चार लसीकरण केंद्राद्वारे १७० नागरिकांना लस देण्यात आली होती.

Coronavirus – राज्यात आज ७ हजार ८६३ नवीन करोनाबाधित वाढले, ५४ रुग्णांचा मृत्यू

ससून सवरेपचार रुग्णालय, कोथरूड येथील जयाबाई सुतार दवाखाना, कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय येथे दिवसभर प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

शासनाच्या निकषानुसार ६० वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्ती नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सोमवारपासून सुरुवात झाली. मात्र, त्यासाठी रविवारी (२८ फेब्रुवारी) रात्री उशिरापर्यंत शासनाकडून कोणत्याही सूचना मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे स्थानिक प्रशासन ‘थांबा आणि पहा’ या भूमिकेमध्ये होते. यंत्रणांची पूर्ण तयारी नसल्याने लसीकरण आणि नोंदणी होणार नसल्याचे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले. त्यानंतर काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडले.