कोणतंही महत्त्वाचं कारण नसताना केवळ पाय मोकळे करण्यासाठी तुम्ही परिस्थितीचं गांभीर्य न ओळखता घराबाहेर पडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जमावबंदी आदेशाला लोक जुमानत नसल्याचं दिसताच सरकारने संचारबंदी लागू केली. तरीही लोक रस्त्यावर फिरत होते. सरकारनं पुढचं पाऊल उचलत पोलिसांना हे सगळं थांबवण्याचे आदेश दिले. त्यानंतर उगाच फिरणाऱ्यांना पोलिसांकडून अद्दल घडवली जात आहे. त्यामुळे पोलिसांविषयी लोकांच्या मनात धाक निर्माण होत असून, याचीच प्रचिती पुण्यातील अलका चौकात आज दिसून आली. पत्नीसोबत घराबाहेर पडलेल्या पतीनं अलका चौकात आल्यानंतर समोर पोलीस दिसताच चक्क पत्नीला तिथेच सोडून पळ काढला.

राज्यात करोनानं थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातील करोना बाधितांचा आकडा शंभरी पलिकडे गेला आहे. त्यामुळे सरकारनं जमावबंदी लागू केली. मात्र, परिस्थितीचं भान न ठेवता नागरिक रस्त्यावर फिरत आहे. त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली. तरीही परिणाम दिसत नसल्यानं पोलिसांनी शिस्तीचा दंडुका हाती घेतला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात आता धाक निर्माण होऊ लागला आहे.

करोना व्हायरस या आजारामुळे जगभरात थैमान घातले. देशात देखील या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजाराचा प्रसार होऊ नये, म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचबरोबर अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मात्र तरी देखील नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहे. त्या दृष्टीने प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून जे विनाकारण फिरत आहे. अशा व्यक्तींना पोलिसांकडून चोप दिला जात आहे. असे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनात भीती देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडल्यावर पोलिसांनी दुचाकी किंवा चारचाकी वाहनातून जाताना कारणे सांगताना दिसत आहे. ज्यांच्या कारणांमध्ये तथ्य असेल त्यांना सोडले जात आहे. मात्र जे विनाकारण फिरतात, अशांना फटके देऊन पुन्हा घरी पाठवले जात आहे. हे सर्व घडत असताना, आज पुण्यातील अलका चौकात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोलीस येणार्‍या-जाणाऱ्या वाहनांची चौकशी करीत होते. एका चारचाकी गाडीची चौकशी पोलीस करीत होते. त्यामागे एक दुचाकीस्वार आला. त्याने गाडी थांबविली. त्याच्या मागे बसलेली पत्नी तेवढ्यात खाली उतरली. पोलिसांच्या प्रश्नाचा भडीमार पाहून दुचाकीस्वारानं बायकोला तिथेच दुसर्‍या बाजूने धूम ठोकली. आपला पती जाताना पाहून, ती महिला अवाक् झाली. आता मी कशी जाऊ, त्यांचा मोबाईल देखील माझ्याकडे आहे. असे म्हणत काही मिनिट ती आहे. त्या ठिकाणी थांबली, पण पती आला नाही. म्हणून ती महिला चालत निघून गेली.