संसर्गवाढीच्या शक्यतेमुळे बाजार समितीचा निर्णय

पुणे : करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर बाजार आवारात करोनाबाधित भागातून येणाऱ्या बाजार घटकांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आल्यानंतर आडते आणि कामगार संघटनेकडून बाजार बंद करण्याची मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अनिश्चित काळासाठी शुक्रवारपासून (१० एप्रिल) भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा विभाग बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

बाजार समितीतील आडते, कामगार संघटनांच्या बैठक गुरुवारी (९ एप्रिल) पार पडली. या बैठकीत बाजार आवारातील आडते, कामगारांच्या अनुपस्थितीमुळे कामकाजावर परिणाम होणार असून करोनाचा संसर्ग विचारात घेता अशा परिस्थितीत काम करणे अवघड झाले आहे, असे मत आडते, कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत बाजार आवारातील भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा विभाग अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

करोनाबाधित भागातील कामगार, आडते, व्यापाऱ्यांना बाजार आवारात प्रवेश करण्यास मज्जाव घालण्याचा निर्णय पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून घेण्यात आला आहे. याबाबतचे आदेश देण्यात आल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते संघटना तसेच कामगार संघटनेने अशा परिस्थितीत काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे बाजाराचे कामकाज तूर्तास बंद ठेवण्यात यावे, अशी विनंती बाजार समितीकडे करण्यात आली होती. ज्या भागात पोलिसांनी कडक निर्बंध घातले आहेत, त्या भागात मार्केट यार्डातील ६० ते ७० टक्के आडते, व्यापारी, कामगार, टेम्पोचालक  वास्तव्यास आहेत. करोनाच्या संसर्गामुळे बाधित भागातून बाजार समितीच्या आवारात येणाऱ्यांना मनाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत काम करणे योग्य ठरणार नाही. याबाबत आडते संघटना तसेच कामगार संघटनेकडून समितीला निवेदन देण्यात आले होते.

आडते संघटनेचे आवाहन

शेतक ऱ्यांनी शेतीमाल बाजारात तूर्तास विक्रीस पाठवू नये, असे आवाहन आडते संघटनेकडून करण्यात आले आहे. बाजारातील गाळ्यांवर सध्या उपलब्ध असलेला शेतीमाल बाहेर नेण्यास सहकार्य करण्यात येईल, असे बाजार समितीकडून कळविण्यात आले आहे.

भाजीपाल्याचा तुटवडा जाणवणार नाही

बाजार समितीचा मुख्य बाजार मार्केट यार्डात आहे. त्याबरोबरच शहरात मोशी, खडकी, मांजरी, उत्तमनगर येथे उपबाजार आहेत. करोनामुळे मुख्य बाजाराचे कामकाज बंद ठेवण्यात येणार असले, तरी उपबाजाराचे कामकाज पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे बाजार आवारात भाजीपाल्याचा तुटवडा न जाणवणार नाही, या दृष्टीने बाजार समितीकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.