करोना विषाणूचे रुग्ण आपल्या देशात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर १७ मे पर्यंत लॉक डाऊन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे अनेक परीक्षा, स्पर्धा, कार्यक्रम आणि लग्न समारंभ अनिश्चित काळासाठी पुढे घेण्यात आले आहेत. मात्र त्याच दरम्यान आज हडपसर पोलिसांनी एका तरुणाचं आणि तरुणीच लग्न लावून देत कन्यादान देखील केले आहे. यामुळे पोलिसांच्या या पुढाकारामुळे त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.

करोना विषाणूमुळे जगभरात लाखो नागरिक बाधित असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जगभरातील सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्या आजाराचे रुग्ण आपल्या देशात देखील आढळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या देशात १७ मे पर्यंत लॉक डाऊन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे अनेक परीक्षा, स्पर्धा आणि लग्न समारंभ पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र याच दरम्यान लॉक डाऊनच्या खाकी वर्दीतील पोलिसांचे एक वेगळे रूप मागील महिन्याभरात अनेक प्रसंगातून पाहिले आहे.

मुक्या जनावरांना चारा, तर बेघर असणार्‍या नागरिकांना दोन वेळचे जेवण देताना पाहिले आहे. मात्र आता याही पुढे जाऊन, हडपसर येथे डेहराडून येथील कर्नल देवेंद्र सिंग यांचा मुलगा आदित्य आणि नागपूर येथील लष्करात मेडिकल विभागात करोना बाधित रुग्णावर अरविंद सिंग कुशावाह हे सेवा देण्याचे काम करीत असून त्यांची मुलगी डॉ स्नेहा यांचा विवाह ठरला होता.

मात्र करोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाउन असल्याने विवाह होणे शक्य नव्हते. त्याच दरम्यान दोन्ही बाजूचे कुटुंबासमोर लग्न कसे करायचे असा प्रश्न पडला. तेव्हा हडपसर पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्याशी संपर्क साधून, लग्ना संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यावर लोणारे यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठांनी तात्काळ परवनगी दिली.

त्यानुसार आज दुपारी अॅमनोरा पार्क येथील हॉलमध्ये लग्न सोहोळा करण्याचे ठरले. लग्नाला दोन्ही बाजूने पाहुणे हे पोलिस होते. आदित्य आणि स्नेहा यांचा विवाह सोहोळ्यात सर्व विधी आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळत पार पडला. आपल्या मुलीचे कन्यादान करण्याचे प्रत्येक वडीलांचे स्वप्न असते, हे भाग्य पोलिसांना लाभले आहे. तर या विवाह सोहोळ्याचे पुणेकर नागरिकांकडून पोलिसांचे विशेष कौतुक केले जात आहे. या विवाह सोहोळ्यास परिमंडळ 5 पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलिस शिपाई अनिल कुसाळकर आणि प्रशांत नरसाळे हे उपस्थित होते.

यावेळी वर आदित्य सिंग म्हणाला की, लॉक डाऊन च्या काळात लग्न कसे होणार असा आमच्या दोघांच्या कुटुंबीयांसमोर एक प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी हडपसर पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्याशी आमच्या कुटुंबातील व्यक्तिचे बोलणे झाले. त्यानंतर आज आमचे सर्व विधी पार पाडत, लग्न झाले आहे. आमच्या लग्न सोहोळ्यास सर्व पोलीस कर्मचारी असल्याने एक वेगळचं समाधान असून त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या लग्नासाठी पुढाकार घेणारे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे म्हणाले की, दोन्ही कुटुंबीयाकडून लग्ना संदर्भात काही करता येईल का असे विचारण्यात आले. त्यानंतर वरीष्ठा सोबत बोलून, आज लग्न सोहोळा पार पडल्याचे त्यांनी सांगितले.