पुणे तसंच रुग्णसंख्या वाढत असलेल्या ठिकाणी लॉकडाउन करण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. पुण्यातील स्थिती अद्यापही गंभीर आहे. त्यामुळे पुणे तसंच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे गेल्या वर्षीसारखा लॉकडाउन लावा असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. आम्हाला आदेश द्यायला लावू नका असंही कोर्टाने सांगितलं. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज आढावा बैठक घेणार असून पुण्यात दाखल झाले आहेत. यावेळी लॉकडउनवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

“पुण्यासारख्या ठिकाणी लॉकडाउन करा”; मुंबई हायकोर्टाची उद्धव ठाकरेंना सूचना

अजित पवार पुण्यात असून सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुण्यात लॉकडाउन लावायचा की नाही यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर लॉकडाउनसंबंधी काय निर्णय झाला आहे याची माहिती मिळेले.

मुंबई हायकोर्टात काय झालं –
पुण्यात अॅक्टिव्ह केसेस १.४ लाख आहेत. आतापर्यंत राज्यात पुण्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे. अन्य ठिकाणांहून पुण्यात लोक उपचारांसाठी येत असल्याने ही संख्या जास्त असल्याचे सरकारने सांगितलं. कोर्टाने यावेळी पुण्यातील संख्या चिंताजनक असल्याचं म्हटलं. तसंच पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे यांनी यशस्वी मॉडेलपासून प्रेरणा घेत समान कार्यक्रम आखला पाहिजे असं मत नोंदवलं.

हायकोर्टाने यावेळी मुंबईतील स्थितीचा आढावा घेतला पाहिजे सांगत जर मुंबई मॉडेलंच सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं असेल तर इतर पालिकांनीही हे मॉडेल स्वीकारलं पाहिजे असा सल्ला दिला.पुणे पालिकेचे वकील कुलकर्णी यांनी यावेळी मुंबईत चांगल्या पायाभूत सुविधा असल्याचं सांगितलं. दरम्यान पुण्यातील स्थितीवर बोलताना कोर्टाने तुमचे पालिका आयुक्त मुंबई पालिका आयुक्तांशी का बोलत नाहीत? अशी विचारणा पुणे पालिकेच्या वकिलांना केली. “तुमच्याकडे अॅक्टिव्ह रुग्णसंख्या दुप्पट आहे. तुमच्याकडील पायाभूत सुविधा मुंबईसारख्या चांगल्या नसतील. पण काहीतरी केलं पाहिजे,” असं कोर्टाने यावेळी खडसावलं.