करोना संसर्ग अटकावासाठी प्रभावी उपाययोजना

पुणे : करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी बारामतीत शहरात राजस्थानातील भिलवाडा शहराप्रमाणे उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. बारामती शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी करोनाचा संसर्ग गांभीर्याने घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बारामती भागात करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी  कठोर र्निबध घालण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. राजस्थानातील भिलवाडा शहराप्रमाणे शहरात र्निबध घालण्यात आले आहेत. बारामती शहरात सध्या भीतीचे वातावरण आहे.त्यानुसार वॉर्डनिहाय मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे.या केंद्राकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच प्रशिक्षित  शासकीय कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे.बारामती शहर आणि ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाची तपासणी करण्यात येणार आहे.ज्यांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. बारामतीतील ज्या भागात करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत,त्या भागातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून पथके तयार करण्यात आली आहे.बारामतीत कठोर निबर्ंध घालण्यात आले आहेत. शहरातील रस्ते बंद करण्यात आले आहेत.जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक वगळता अन्य वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही.

 

गुन्हे दाखल करणार

बारामती भागातील अनेक जण संचारबंदीच्या आदेशाचे भंग क रुन क्रिकेट खेळत असल्याचे निदर्शनास आले आहे.नीरा डाव्या कालव्यात पोहायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.बारामतीत कठोर र्निबध घालण्यात आले आहेत.आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भादंवि १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, तसेच मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले,की बारामतीत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.त्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ते सहकार्य केले जाणार आहे.

भिलवाडा पॅटर्न म्हणजे काय?

* शहरात संचारबंदी; वाहतुकीसाठी रस्ते बंद

* आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी तपासणी

* सर्दी, खोकला, तापाची लक्षणे आढळल्यास विशेष लक्ष

* शहरात कठोर र्निबध; सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन

*  नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच