वर्षभरानंतरही चिंता कायम

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : चीनसारख्या एका दूरच्या देशात सुरू झालेला करोना विषाणूचा संसर्ग पुणे शहरात आणि पर्यायाने महाराष्ट्रात दाखल झाला, त्याला मंगळवार (९मार्च) एक वर्ष पूर्ण होत आहे. करोना विषाणूचे रुग्ण शहरात आढळण्यास सुरुवात झाली, त्यावेळी एक वर्ष ही साथ पहायला मिळेल या शक्यतेचा विचारही कोणी के ला नव्हता, मात्र नागरिकांची बेफिकिरी, प्रशासनाची ढिलाई आणि स्वयंशिस्तीचा अभाव पाहाता रुग्णसंख्येची सद्याची स्थिती चिंतेची बाब ठरत आहे.

दुबईहून पर्यटन करून आलेल्या दाम्पत्याला झालेला संसर्ग करोना विषाणूचा आहे, यावर ९ मार्च २०२० ला शिक्कामोर्तब झाले. पाठोपाठ दाम्पत्याच्या नजिकच्या संपर्कात असलेली त्यांची कन्या, त्यांना मुंबईहून पुण्यापर्यंत सोडणारा कॅ ब चालक अशी रुग्णसंख्या वाढत गेली. मार्च २०२० च्या अखेरीस पुणे जिल्ह्य़ातील रुग्णसंख्या जेमतेम ५० पर्यंत पोहोचली, मात्र बरोबर एक वर्षांनंतर या संख्येने चार लाखांचा टप्पा पार के ला आहे. ऑक्टोबर ते जानेवारी अशा मोठय़ा कालावधीत करोना रुग्णसंख्या बरीच आटोक्यात आल्यामुळे ‘करोनाचा धोका टळला’असे समजून नागरिकांनी पूर्ववत आयुष्य सुरू के ले, मात्र वातावरणातील सततचे चढउतार, मुखपट्टी वापरण्यास के लेली टाळाटाळ यांमुळे मार्च महिन्यात पुन्हा रुग्णसंख्येने चढता क्रम स्वीकारला आहे. जानेवारीपर्यंत पुणे आणि पिंपरी शहरात १५०-२०० आणि जिल्ह्य़ात ३५०-४०० पर्यंत खाली आलेल्या रुग्णसंख्येने जिल्ह्य़ात पुन्हा दैनंदिन दोन हजारांचा टप्पा गाठला आहे. गर्दी न करणे, शारीरिक अंतराचा नियम न पाळणे, आजाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला न घेणे अशी बेफिकिरी कायम राहिल्यास करोनाचे संकट टळणे अवघड असल्याची भावना तज्ज्ञ डॉक्टर व्यक्त करतात.

पुणे महापालिके चे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे शहरात पहिला रुग्ण आढळल्यापासून या संकटाशी दोन हात करत आहेत. डॉ. वावरे म्हणाले, मागील वर्षी बहुतांश काळ टाळेबंदी असल्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवणे शक्य होते. टाळेबंदीचे सर्व नियम संपूर्ण शिथिल के ल्यानंतर रुग्णवाढ अपेक्षित होती, मात्र सध्या दिसणारी रुग्णवाढ अपेक्षेहून अधिक आहे. बाहेरचे चित्र आपण एका मोठय़ा महामारीच्या काळात जगत आहोत, असे नाही. सर्व प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर बसवून नागरिकांनी पूर्ववत जगणे सुरू के ले आहे.