News Flash

करोनामय वर्ष : दुबई ते पुणे.. आणि नवा प्रवास!

२०२० च्या सुरुवातीलाच चीनमधून करोना विषाणू संसर्गाच्या बातम्या आपल्यापर्यंत येऊन थडकण्यास सुरुवात झाली.

भक्ती बिसुरे, लोकसत्ता

२०२० च्या सुरुवातीलाच चीनमधून करोना विषाणू संसर्गाच्या बातम्या आपल्यापर्यंत येऊन थडकण्यास सुरुवात झाली. ‘हा विषाणू आपल्यापर्यंत पोहोचला तर काय?’ हा प्रश्न तेव्हा अनेकांना पडला, मात्र प्रत्यक्षात तो आपल्यापर्यंत येऊन ठेपल्यानंतर आयुष्यात कधीही कल्पना न के लेले अनुभव शहराने घेतले. नऊ मार्च २०२० ला राज्यातील पहिला करोनाचा रुग्ण पुण्यात सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि एक अनामिक भीती जाणवण्यास सुरुवात झाली. दिवसाचे २४ तास आपल्याच धुंदीत वाहतं असलेलं पुण्यासारखं शहर अक्षरश: ठप्प झालं. माणसं घरात बसली. कालांतराने शहरात करोनाने हाहाकार माजवला. रुग्णालयं भरून वाहिली. खाटा कमी पडल्या. अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली.

कु णी नोकरी-व्यवसाय गमावले. हसत्या-खेळत्या शहराची रया गेल्याचा अनुभव प्रत्येकाने घेतला. या डोंगराएवढय़ा संकटातही डॉक्टर, परिचारिका, पोलिस, स्वयंसेवी संस्था काम करत राहिल्या, त्यामुळे टाळेबंदी आणि संकट काहीसं सुकर झालं. संकटाचं एक वर्ष आज संपलं. शहर आता हळूहळू पूर्वपदावर येतंय.. तरी करोना अद्याप संपलेला नाही, त्यामुळे खबरदारी घेणं आलंच.. करोना काळातील काही चांगल्या- वाईट आठवणी जागवणारी वृत्तमालिका आजपासून!

पुणे : मार्च २०२० मध्ये लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त दुबईची सहल आखली. त्या वेळी परत आल्यानंतर एक नवे आयुष्य आपल्या समोर वाढून ठेवले असेल, याची कल्पना नव्हती. या सहलीहून परत आल्यानंतर आम्हाला झालेले ‘व्हायरल’ म्हणजे जगभर थैमान घालत असलेला करोना आहे, हे समजले आणि आमचे आयुष्यच बदलले.. राज्यातील पहिले करोना रुग्ण ठरलेले जीवंधर आवटी सांगतात. त्या वेळी त्यांच्या त्या मन:स्थितीची कल्पना आज आपण सगळेच करू शकतो.

मागील वर्षी नऊ मार्चला आवटी दाम्पत्याला करोना संसर्ग झाला. राज्यातील ते पहिले करोना रुग्ण असल्यामुळे साहजिकच संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. चीनमध्ये फै लावलेला करोना दुबईमार्गे पुण्यात आणि महाराष्ट्रात आला, त्यानंतरचे संपूर्ण वर्ष अनेक कारणांनी आपल्यासाठी ऐतिहासिक ठरले. या ऐतिहासिक घटनांना एक वर्ष पूर्ण होत असताना जीवंधर आवटी यांनी ‘लोकसत्ता’ शी संवाद साधत, वर्षभरातील घडामोडींना उजाळा दिला.

आवटी म्हणाले,‘ दुबईहुन परतलो आणि कणकण, अंगदुखी, थकवा जाणवला. तीन दिवसांनी त्रास कमी झाला. दोन दिवसांनी पुन्हा थोडा त्रास झाला. परदेश प्रवास झाल्यामुळे फॅ मिली डॉक्टरांनी करोना चाचणी करण्यास सुचवले. चाचणीचा ‘पॉझिटिव्ह’ अहवाल हाती आला, त्या वेळी आम्हाला जाणवणारी सर्व लक्षणे संपून आम्ही ठणठणीत होतो, मात्र नियमाप्रमाणे १४ दिवसांचे विलगीकरण महत्त्वाचे होते. प्रत्यक्षात, आम्हाला काहीही त्रास होत नसल्यामुळे ते विलगीकरण ही शिक्षाच होती. प्रत्यक्ष नाव जाहीर झाले नसले तरी एका रात्रीत आम्ही सगळ्या प्रसार माध्यमांच्या ‘हेडलाईन’ मध्ये होतो. त्याचे दडपण होते, मात्र आजाराचा त्रास नाही हा दिलासाही होता. नायडू रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात सर्वच जण आम्हाला दिलासा देत होते. ‘तुम्ही लवकर निगेटिव्ह होऊन घरी जाणार’ हा विश्वास देत होते. गुढी पाडव्याच्या शुभ दिवशी आम्ही नायडू रुग्णालयातून घरी परत आलो. रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी फु लांच्या पाकळ्या उधळून, टाळ्या वाजवून आम्हाला निरोप दिला, तेव्हा एका मोठय़ा संकटातून सहीसलामत सुटून घरी परतत असल्याची भावना होती. राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी के लेली कविता आमच्यासाठी विशेष आहे, अशी हृद्य आठवण आवटी सांगतात. पुढे रुग्ण वाढले तशी भीती, काळजी, गैरसमज अशा सगळ्याच गोष्टी वाढत होत्या. जवळच्या कोणाला संसर्ग झाल्याचे समजले तर अनेकांनी आमच्याशी संपर्क साधला. मन मोकळे के ले. त्या वेळी,  ‘आम्ही बरे झालो, तुम्हीही औषधोपचार घ्या, नक्की बरे व्हाल!’ असे सांगत आम्ही सर्वाना दिलासा दिला. रक्तद्रव – ‘प्लाझ्मा’ उपचारांना परवानगी मिळताच मी प्लाझ्मा दाता होऊन इतर रुग्णांना बरे करण्यात आपले लहानसे योगदान देण्याचे ठरवले. आजार माहिती नाही, विषाणू दिसत नाही, कसा पसरतो माहिती नाही इथपासून ते देशातील ९६-९७ टक्के  रुग्ण बरे होऊन घरी जातात हे पाहणे,

देशात तयार झालेली लस वापरून करोना प्रतिबंधात्मक मोहीम सुरू झालेली पाहणे असे अत्यंत नकारात्मक ते अत्यंत सकारात्मक अनुभव या वर्षांने आम्हाला दिले.

खबरदारीचे आवाहन

महामारीला एक वर्ष पूर्ण होत असताना पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. काही नागरिक आजही बेफिकीर आहेत. त्या सगळ्यांना मला आवाहन करावेसे वाटते,की या आजाराने गंभीर रूप धारण के ले तर त्याला आवरणे डॉक्टरांना जिकिरीचे ठरते. त्यामुळे परस्परांची काळजी घेण्यासाठी प्रतिबंधात्मक नियम पाळा आणि यंत्रणांना सहकार्य करा. मागील पूर्ण वर्ष आपल्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य सेवकांसाठी आपण तेवढेच करू शकतो, अशा शब्दांत आवटी यांनी नागरिकांना खबरदारीचे आवाहन के ले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2021 2:49 am

Web Title: coronavirus pandemic one year of corona dubai to pune and new journey coronamay varsha dd 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढीला
2 मासिक पाळीसाठीच्या कपची निर्मिती
3 शिवाजीनगर न्यायालयात विस्तारित इमारतीसाठी ९६ कोटी
Just Now!
X