करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात चौका-चौकांमध्ये नाकाबंदी करत पहिल्याच दिवशी नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. अनेक नागरिकांना पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तर पळून जाणाऱ्या वाहनचालकांना लाठीचा प्रसादही देण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांगलाच बंदोबस्त पहायला मिळत होता.

महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून याच पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यासह शहरांमध्ये संचारबंदीचे निर्बंध लावण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये सोमवारपासून रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या तरी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत हीच स्थिती राहणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने संचारबंदीचे तंतोतंत पालन करून प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे.

शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठीक रात्री ११ वाजता संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली. यावेळी अनेक नागरिकांची धावपळ झालेली पहायला मिळाली. काही माहित नसल्याचा आव आणत अनेकांनी पोलिसांना मिळेल ते कारण सांगत दंडात्मक कारवाईपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, वरिष्ठ पोलीस अधिकारी रंगनाथ उंडे आणि गुन्हे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी नागरिकांना समजावून सांगत कारवाई करत पुन्हा संचारबंदीचे उल्लंघन करू नका अस ठणकावून सांगितलं. दरम्यान अनेक विनामास्क दुचाकी चालकांनी नाकाबंदीदरम्यान पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काहींना पहिल्याच दिवशी लाठीचा प्रसाद मिळाला. नागरिकांनी पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.