परदेशातून येणाऱ्यांनी विलगीकरणाचे नियम तोडले तर कठोर कारवाई करणार आहोत. एका व्यक्तीसाठी पूर्ण समाजाला वेठीस धरणार नाही असा स्पष्ट इशारा पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे. करोनाच्या पार्श्वभुमीवर दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषद घेत सध्या पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये काय परिस्थिती आहे याची माहिती दिली.

“परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाला २४ तास विलगीकरण कक्षात ठेवलं जाईल. गरज असल्यास त्यांना रुग्णालयात भरती केलं जाईल किंवा घऱात स्वतंत्र ठेवलं जाईल. जर ठरवून दिलेल्या दिवसांच्या आधी संबंधित व्यक्ती बाहेर आली तर कारवाई केली जाईल. परदेशातून येणाऱ्यांनी विलगीकरणाचे नियम तोडले तर कठोर कारवाई करणार आहोत. एका व्यक्तीसाठी पूर्ण समाजाला वेठीस धरणार नाही,” असं दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं आहे.

“१८ नवे संशयित लोक सापडले असून २४ तासात ३२ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात करोनाची लागण झालेला एक रुग्ण सापडला असून तो पिंपरी चिंचवड क्षेत्रातील आहे, १४ मार्चला अमेरिकेतून दुबईमार्गे मुंबईतून पुण्यात तो आला, त्यांच्याशी संबंधित सर्वांची तपासणी सुरु आहे. पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या सध्या १७ वर पोहोचली आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “पुण्यात गुन्हे शाखेकडून २७ लाखांचं बनावट सॅनिटायजर जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केलं असता सहा आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली”.

“सर्व सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. पण अत्यावश्यक सुविधा असलेली कार्यालये सुरु राहतील. तसंच ३१ मार्चपर्यंत नवीन परवाने दिले जाणार नाहीत. आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यामुळे तेथील सर्व कार्यालये बंद करणार,” असल्याचं दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं आहे.