पुणेकरांसाठी एक दिलासादायक, तर दुसरी काळजी घ्यायला लावणारी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या करोनाग्रस्त १६ रुग्ण बरे झाले असून, त्यांना सुटी देण्यात आली आहे. मात्र, प्रशासनासमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. पाच जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या पाचपैकी एक जण हा ९३ जणांच्या ग्रुपसोबत थायलंडला फिरायला गेला होता. त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रातील पहिला करोनाग्रस्त रुग्ण पुण्यात सापडला होता. त्यानंतर पुण्याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं. पुणे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णासंबंधी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. डॉ. म्हैसकर म्हणाले,’सध्या जिल्ह्यात १५ करोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे १६ जणांची प्रकृती बरी झाल्यानं त्यांना सुटी देण्यात आली आहे. काल काहीजण परदेशातून आले होते. त्यातील तीन जणांना करोनासदृश्य लक्षणं दिसली आहेत,’ असं ते म्हणाले.

आमच्यासाठी चिंता वाढवणारी बाब

डॉ. म्हैसकर म्हणाले की,’आतापर्यंत जे करोनाबाधित रुग्ण सापडले. ते परदेशातून आलेले वा परदेशातून आलेल्यांच्या संपर्कात आलेले होते. पण, नव्यानं पाच जणांचे अहवाल आले आहेत. यातील चार जण कुठेही फिरण्यास गेलेले नव्हते. हे सर्व करोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यायला हवी. आणखी एक महत्वाची आणि चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे या पाच पैकी एक जण थायलंडमधून परत आला आहे. ही व्यक्ती ९३ जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली होती. त्यामुळे आता प्रशासनानं त्या ग्रुपमधील इतरांचा शोध घेण्याचं काम हाती घेतलं आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.

मॉल्समधील ही दुकानं खुली राहणार

‘करोनाचा प्रसार रोखण्यासाठी दोन्ही प्रकारचं नियोजन करत आहोत. काही भागात १४४ कलम लावण्याचा विचार करत आहोत. त्याचबरोबर अनावश्यक गर्दी टाळण्याचंही नियोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील पार्क बंद करण्यात येणार आहेत. वसतिगृहात जे विद्यार्थी राहत आहेत. त्यांना बाहेर काढण्याच्या कुठल्याही सूचना नाही. परीक्षा होईपर्यंत हे विद्यार्थी वसतिगृहातच राहतील. सरकारनं मॉल्स बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पण, मॉल्समधील ड्रग्ज (मेडिकल), भाजीपाला आणि ग्रॉसरी (किराणा) हे सुरू राहतील. याशिवाय कुठलंही दुकान सुरू ठेवलं जाणार नाही,’ असं म्हैसकर यांनी सांगितलं.