करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. यामुळे कामानिमित्त परराज्यात गेलेले अनेक नागरिक तिथेच अडकून पडले आहेत. पुण्यातील अनेक हॉटेल्समध्ये काम करणार्‍या कामगारांवर डेक्कन जवळील नदी पात्रालगत असलेल्या फुटपाथवर राहण्याची वेळ आली आहे.

१४ एप्रिलपर्यंत लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकांना इतरत्र जाता किंवा येता येत नाही. या निर्णयामुळे देशातील जवळपास सर्व कंपन्या, संस्था, हॉटेल यांचे सर्व व्यवहार ठप्प झाले असून त्याचे परिणाम दिसत आहे. अशीच परिस्थिती पुणे शहरात देखील पाहण्यास मिळत असून पुण्यातील हॉटेलमध्ये काम करणार्‍या कामगारांवर डेक्कन जवळील नदी पात्रालगत असलेल्या फुटपाथवर राहण्याची वेळ आहे.

या ठिकाणी राज्याच्या अनेक भागातून कामासाठी आलेले कामगार मागील तीन दिवसापासून फुटपाथवर राहत आहेत. यातील काही व्यक्तीसोबत संवाद साधला. त्यावेळी रत्नागिरी येथील चंद्रकांत पंडित म्हणाले की, “मी पुण्यात मागील १० वर्षांपासून हॉटेलमध्ये कामानिमित्त आलो आहे. आज पर्यंत केव्हाही रस्त्यावर राहण्याची वेळ आली नाही. पण तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे मला गावाला जाता आले नाही. पुण्यात माझ कोणी राहण्यास नसून त्यामुळे आता फुटपाथवर राहण्याची वेळ आली आहे. माझ्या सोबत अनेक जण आहेत. पोलिस आम्हाला या ठिकाणी राहू देत नाहीत. आम्हाला मारले देखील, पण ते त्यांच काम करीत आहेत. आमची एकच मागणी आहे. आम्हा सर्वांची कुठ तरी व्यवस्था करून द्यावी, तसेच मागील तीन दिवसात शहरातील अनेक नागरिकांनी आम्हाला नाष्टा आणि जेवण आणून दिले आहे. त्याबद्दल कायम पुणेकर नागरिकांचा ऋणी राहीन” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सावंतवाडी येथील संजय सावंत म्हणाले की, “आम्ही तीन दिवसापासून रस्त्यावर राहतो आहोत. या काळात आम्हाला शहरातील अनेक नागरिकांनी मदत केली आहे. पण राज्य सरकारने दिल्ली सरकार प्रमाणे कुठे तरी आम्हा सर्वांना एकत्रित ठेवण्याची व्यवस्था करावी” अशी मागणी त्यांनी केली.

फुटपाथवर राहणार्‍या नागरिकांसाठी पुण्यातील मंडळाकडून अल्पोपाहाराचे वाटप
करोना व्हायरस या आजारामुळे देशात लॉक डाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातील प्रामुख्याने हॉटेल, मेस बंद असल्याने अनेकावर उपासमारीची वेळ आली. बाहेर गावावरून कामासाठी आलेल्या नागरिकांचे हाल अधिक होत आहे.

हेच लक्षात घेऊन कसबा पेठेतील श्रीमंत बाळोबा मुंजोबा देवस्थान ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी नदी पात्रात लगत असलेल्या फुटपाथवर राहणार्‍या हॉटेलमधील कामगारांना अल्पोपाहार म्हणून पोहे दिले. यामुळे तेथील कामगारांनी या सर्व कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले. तर यावेळी मंडळाचे कार्यकर्ते तुषार शिंदे म्हणाले की, जो वर देशात लॉक डाऊन असेल तो पर्यंत आम्ही या ठिकाणी असणार्‍या नागरिकांना अल्पोपाहार म्हणून विविध वस्तूंचे वाटप करणार असून पुणेकर नागरिकांनी देखील अशा गरजू नागरिकांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.