करोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या हँड सॅनिटायझरची निर्मिती करून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) १० लीटर हँड सॅनिटायझर केंद्रीय पोलिसांच्या पुणे कार्यालयाकडे सुपुर्द करण्यात आले. करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये रुग्णालये, शासकीय यंत्रणेला सॅनिटायझरची गरज आहे. तसेच बाजारपेठेतही तुटवडा निर्माण झाला आहे.

‘संचारबंदी लागू होण्यापूर्वी एनसीएलच्या प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांनी डब्ल्यूएचओच्या निकषांप्रमाणे सॅनिटायझर तयार केला. त्यानंतर पोलिसांकडून मागणी आल्याने त्यांना दहा लीटर सॅनिटायझरचा कॅन देण्यात आला. सॅनिटायझर तयार करण्यासाठी रसायनांची आवश्यकता असल्याने त्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे. सध्या आमच्याकडे उपलब्ध असलेला साठा आणि आणखी पुरवठा झाल्यास मागणीप्रमाणे सॅनिटायझर तयार करून देता येऊ शकेल, असे एनसीएलचे प्रभाकर इंगळे यांनी सांगितले.