जगावर आलेले करोना विषाणूच्या रुपातील अरिष्ट दूर होण्यासाठी खास मालवणी शैलीत गाऱ्हाणे घालण्यात आले आहे. रंगकर्मी सागर अत्रे यानी या गाऱ्हाण्याचा व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमात पोस्ट केला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार करोना विषाणूला हरवण्यासाठी शक्य ते सर्व उपाय करत आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत देशातील करोना बाधितांचा आकडा अद्याप फार वाढलेला नाही. मात्र, दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रयत्नांबरोबरच दैवी शक्तीला साकडे घालण्यात येत आहे.

मालवणी पद्धतीच्या गाऱ्हाण्याचा व्हिडिओ करण्याबाबत पुण्यातील रंगकर्मी सागर अत्रे म्हणाले, प्रथेप्रमाणे कोणतेही कार्य सिद्धीस जावे यासाठी ईश्वराला प्रार्थना केली जाते जेणेकरून कार्य निर्विघ्न पार पडेल. तशी नाट्यपरंपरा देखील आहे. ही परमेश्वराला मारलेली हाक आहे. या गाऱ्हाण्यात असे सांगितले गेले आहे की हे परमेश्वरा आता नुकताच होळीचा सण होऊन गेला, नववर्षाची सुरवात देखील झाली मग असं काय पाप, चूक आमच्या हातून घडली की हे कोरोना नावाचे अरिष्ट आमच्यावर कोसळलं आहे. आमची चूक पोटात घालून आमची सेवा मान्य कर व हे अरिष्ट नाहीसं कर, आम्हाला माफ कर. वार्षिक उत्सव,जत्रा,यात्रा येथे असे गाऱ्हाणे घालायची रीत आहे. परमेश्वर हाक ऐकतो अशी श्रद्धा आहे.