केंद्र सरकारच्या आदेशानुसार देशभरात लसीकरणला सुरुवात झाली असून, पुण्यात आजअखेर १ लाख ७५ नागरिकांना लस देण्यात आलेली आहे. शहराची लोकसंख्या लक्षात घेता, दररोज ३० ते ४० हजार नागरिकांना लसीकरण करण्याची गरज आहे. मात्र सध्या १३ ते १४ हजार नागरिकांना लसीकरण केले जात आहे. लसीकरण वाढविल्यास पुणे शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण दोन महिन्यात पूर्ण होईल, असा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. मात्र यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने योग्य समन्वय साधून लसीकरण वाढवावे, अशी मागणी देखील त्यांनी केली. तर यामुळे शहरातील करोना संसर्ग नियंत्रणात येण्यास अधिक मदत होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
तसचे, यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले की, राज्यातील अनेक भागात करोनाबाधित रुग्ण वाढतं आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करीत आहे. मात्र त्यावर लॉकडाउन हा पर्याय नाही. तसे झाल्यास सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. पुण्यातील रुग्ण संख्या नियंत्रणात न आल्यास भविष्यात नव्याने पावलं उचलली जाऊ शकतात, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
याचबरोबर, वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन, आपली सर्व यंत्रणा सक्षम आहे. पण शहरातील ८० टक्के रुग्ण हे होम आयोसोलेशनमध्ये असून, सध्या आपल्याकडे ४ हजार ३०० बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी साधारण २ हजार २०० बेड रिक्त असून भविष्यात जम्बो रुग्णालय देखील सुरू केले जाईल. मात्र नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, तसेच सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2021 8:30 pm