करोना व्हायरस या आजाराचे रुग्ण आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. पुण्यात देखील रुग्ण आढळत असून आज सकाळी दोघा दाम्पत्याना घरी सोडण्यात आले. त्याला काही तास होत नाही. तोपर्यंत आणखी तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या तिघांना उद्या सकाळी सोडले जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच मागील ४८ तासात एक ही रुग्ण बाधित आढळला नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, करोना व्हायरस या आजाराचे रुग्ण जगभरात झपाट्याने आढळून येत आहे. या आजाराचे रुग्ण आपल्या देशात देखील आढळत असून पुण्यात मागील पंधरा दिवसात १९ रुग्ण हे बाधित होते.दुबई येथून आलेल्या पती, पत्नी ९ तारखेला बाधित झाल्याची माहिती समोर आली. तेव्हा त्यांना नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या दोघांवर १४दिवस उपचार करण्यात आले. त्यांचा ठरलेल्या नियमानुसार कालावधी पूर्ण झाला. त्यानंतर त्यांच्या मागील दोन दिवसात तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये दोघांचे ही रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे दोघांना आज सकाळी सोडण्यात आले. राज्यातील पहिले दाम्पत्य घरी ठणठणीत सोडण्यात आले आहे. हे सर्व घडत असताना. जे दाम्पत्यास आज घरी सोडण्यात आले. त्या दोघांना मुंबई येथून पुण्यात आणणारा टॅक्सी चालक, तसेच त्या दांपत्याची मुलगी आणि अन्य एकास असे तिघे जण १० मार्च रोजी बाधित आढळले होते. त्या तिघांवर नायडू रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. त्यांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला. त्यांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, आता त्या तिघांना उद्या (गुरुवारी) सकाळी सोडले जाणार असल्याचे सांगण्यात आले.