करोना व्हायरस प्रादुर्भाव देशभरात दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्यातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात देखील रोज करोनाचे रुग्ण समोर येत आहेत. कोंढवा येथील 61 वर्षीय आजोबांमुळे 3 वर्षीय नातीला करोनाची बाधा झाल्याची माहिती आजच्या अहवालात समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून आज पुण्यात एकाच दिवसात सात रुग्ण बाधित आढळले आहेत.

महाराष्ट्रात करोनाचे 416 रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यात आज एकाच दिवसात सात रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील रुग्णांची संख्या 46 पोहोचली आहे. यापैकी 9 जण करोना मुक्त झाले आहेत. आज ससून रूग्णालयात 45 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. पुण्यात करोनाचा हा दुसरा बळी  ठरला आहे.

शहरात विविध भागातील पाच व्यक्तींना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर हे सर्व बाधित रुग्ण बाहेर गावी कुठे गेले होते का? तसेच यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध देखील घेतला जात आहे. याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे.