करोनाचा संसर्गामुळे राज्याच्या विविध भागात चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे. विशेषतः मुंबई-पुण्यात रुग्णांच्या आकड्याबरोबर मृतांचा आकडा वाढू लागल्यानं सरकारची चिंता दिवसागणिक वाढत चालली आहे. बुधवारी पुण्यात तब्बल दहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. आजही पुणे शहर आणि जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यात बारामतीतील एका रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मृतांचा आकडा २० वर पोहोचला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला. त्यानंतर पुणे शहरापाठोपाठ मुंबई आणि नागपूरमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले. पहिल्या दोन आठवड्यात संथ असलेल्या करोनाच्या प्रसाराचा अचानक वेग वाढला आणि मुंबई, पुणे नव्हे तर राज्यातील इतर भागातही करोनाचे रुग्ण आढळून आले. सध्या मुंबई आणि पुण्यातील स्थिती गंभीर बनली आहे.
करोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेत असलेल्या आरोग्य यंत्रणा आणि राज्य सरकारसमोर एक नवं आव्हान घोंगावत आहे.

राज्यातील बळीचा आकडा अपेक्षित असलेल्या दरापेक्षा दुपट आहे. कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका मुंबईच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे पुण्यात मृत्यूच प्रमाण प्रचंड वेगात वाढल आहे. बुधवारी विविध रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दहा रुग्णांचा मृत्यू झाला. तर गुरूवारी सकाळी दोन मृत्यूची नोंद झाली. यात बारामतीमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा बारामतीत तालुक्यातील पहिला बळी आहे. ही भाजी विक्रीचा व्यवसाय करायची. पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या कुटुंबातील मुलगा, सून आणि दोन नातींनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. दोन जणांचा मृत्यू झाल्यानं पुणे जिल्ह्यात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुणे शहरात १६८ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड २२, पुणे ग्रामीण १४ असे एकूण २०४ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.

राज्यातील संख्या १२९७ वर

एकीकडे राज्य सरकारकडून कृती कार्यक्रम राबवला जात असताना करोनाच्या प्रसाराचा वेग कमी होण्याऐवजी वाढत असल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. गुरूवारी १६२ जणांना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या १२९७ वर पोहचली आहे. आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.