सक्रिय रुग्णसंख्येत घट; करोनामुक्त वाढले, मृत्यूही कमी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील करोना तुलनात्मकदृष्टय़ा बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याचे दिलासादायक चित्र काही दिवसांपासून दिसू लागले आहे. शहरातील सक्रिय रुग्णसंख्या कमालीची घटली असून करोनामुक्तांची संख्या वेगाने वाढते आहे. त्याचप्रमाणे, शहरातील दररोज होणारी मृत्युसंख्या कमी झाली आहे.

शहरात ११ मार्चला करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तर, पहिला मृत्यू १२ एप्रिलला झाला. सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णसंख्या कमी होती. मात्र, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांत मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला. दरदिवशी हजार-बाराशे रुग्णसंख्या आढळून येत होती, त्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये परिस्थिती सुधारली. दोनशेच्या आत करोनाचे नवे रुग्ण आढळून येऊ लागल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले. दुसरीकडे, उपचारानंतर बरे झालेल्यांचे दररोजचे प्रमाणही वाढले आहे. करोनाबाधितांची संख्या ८७ हजारांवर असताना आजमितीला बरे होऊन गेलेल्या रुग्णांची संख्या ८३ हजारांपुढे गेली आहे.

त्याचप्रमाणे, शहरातील मृत्यूचे प्रमाण आता नियंत्रणात आल्याचे दिसून येते. दररोज होणाऱ्या मृत्यूंचा आकडा कमी होत चालला आहे. २७ ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत शहरातील २१४६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यातील १५१९ रुग्ण शहरात वास्तव्यास होते. तर, ६२७ रुग्ण बाहेरगावावरून पिंपरीत उपचारासाठी दाखल झाले होते, अशी पालिकेकडे नोंद आहे.

* पिंपरीतील एकूण रुग्णसंख्या – ८७ हजार ०५१ (२७ ऑक्टोबपर्यंत)

* उपचार होऊन बरे झालेले – ८३ हजार ३७४

* मृत्युसंख्या ( एकूण) – २,१४६

* पालिका हद्दीतील  – १५१९

* हद्दीबाहेरील – ६२७

पिंपरीतील तारखेनिहाय मृत्यूंची संख्या

२७ ऑक्टोबर – १०

२६ ऑक्टोबर – ५

२५ ऑक्टोबर –  १

२४ ऑक्टोबर – ८

२३ ऑक्टोबर – ५

करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी, नागरिकांनी यापुढेही खबरदारी घेतली पाहिजे. शासकीय तसेच आरोग्यनियमांचे पालन केले पाहिजे.

डॉ. पवन साळवे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी पालिका