पुण्यात सध्या कोरोनामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत झाल्याचे दिसत आहेत. एकीकडे सरकारकडून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे दररोज आवाहन केले जात असताना दुसरीकडे अद्यापही काही बेजबाबदार व्यक्ती विनाकारण रस्त्यावर येतच आहेत.

अशा नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी व त्यांना घरातच थांबवण्यासाठी पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याच्यावतीने एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी ही अभिनव संकल्पना मांडली असून सहायक पोलिस फौजदार प्रमोद कळमकर यांनी आपल्या गाण्यातून नागरिकांना एक उत्तम संदेश दिला आहे. त्यांनी स्वतः हे प्रबोधनात्मक गीत लिहून ते स्वतः गायले आहे.

पोलीस हा जनतेचा रक्षक असतो आणि आज अडचणीच्या काळात तो अत्यंत ठामपणे जनतेच्या पाठीशी उभा राहिला आहे. मित्रांनो करोना रस्त्यात आपल्याला गाठायला थांबला आहे, त्याचे रूप कोणतेही असू शकते, त्याच्या पासून वाचण्यासाठी काही काळ तुम्ही घरातच राहा. असा संदेश या मधून दिलेला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक सुरेंद्र धुमाळे, पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत सप्ताळे,  मनोज अभंग, पोलीस हवालदार श्रीकांत शिरोळे, रेवणनाथ देवकर, आदिनाथ देवकर, मीरा वाकोडे यांनी या कार्यात त्यांना सहकार्य केले आहे.