करोना विषाणूचा प्रादुर्भाव भविष्यात होऊ नये म्हणून लसनिर्मितीचे काम सुरू असून चार कंपन्यांचे निष्कर्ष आता हाती आले आहेत. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात तातडीच्या वापराचे परवाने दिले जातील. त्यामुळे मार्च व एप्रिलपासून लसीकरणास सुरुवात होऊ शकते, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी केले.

लातूर येथील स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेत ‘संवाद जागतिक आरोग्यतज्ज्ञांशी’ या ऑनलाइन संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. द व्हॅक्सीन अलायन्सच्या आरोग्यतज्ज्ञ डॉ. रंजना कुमार व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची उपस्थिती होती.

करोना साथीची स्थिती, दुसरी लाट येण्याची शक्यता, आरंभीची भाकिते आणि सद्यस्थिती, सामूहिक प्रतिकारशक्ती आदी प्रश्नांची उकल व्हावी म्हणून या वर्षी व्याखानमालेत विशेष संवादाचे आयोजन केले असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ व पत्रकार अतुल देऊळगावकर यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले.

‘खूप वर्षांनी महामारी आली. त्याची पूर्वकल्पना तज्ज्ञांनी दिली होती. पर्यावरणाचे समतोल राखले जात नसल्याने असे दुष्परिणाम होतात. जंगली जनावरे आणि पाळीव प्राणी यांच्यातील दरी कमी झाली. त्यातून विषाणू प्रसार सुरू झाला. सार्स १, मर्स ही त्याची उदाहरणे असल्याचे सांगत करोना हा विषाणू नैसर्गिक असण्याची शक्यता आहे. त्यावर अजून संशोधन सुरू आहे.’ असे सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या.

मुखपट्टी, अंतर नियम आणि हात स्वच्छ धुण्याच्या त्रिसूत्रीचा अवलंब करताना आरोग्य साक्षर होण्याची गरज आहे. समाजमाध्यमातून मिळणाऱ्या माहितीचे खातरजमा न करता अनुकरण करणे घातक असल्याचेही त्या म्हणाल्या. करोनाच्या लशीबाबत विविध कंपन्यांकडून आलेले निष्कर्ष दिलासा देणारे असल्याने तातडीने परवाना देण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असेही सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या.

औषधांचा अतिवापर घातक

लस सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी ‘द व्हॅक्सीन’ ही संस्था काम करत असल्याचे डॉ. रंजना कुमारी यांनी सांगितले. करोनावर उपचार करताना औषधांचा अतिवापर रुग्णांना अडचणीचा ठरू शकतो. ग्रामीण भागात आरोग्य बळकटीकरणावर भर दिला पाहिजे. प्राथमिक उपचारासाठी आयुर्वेदाला महत्त्व दिले पाहिजे, असेही या वेळी सांगण्यात आले. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी अशा व्याखानमालांची गरज असल्याचे सांगितले.