अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित के लेल्या लशीचे उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूटकडून करण्यात येत आहे. लशीचे विकसन आणि उत्पादन यांच्या प्रक्रियेचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरम इन्स्टिटय़ूटला शनिवारी भेट देऊन घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हवाई दलाच्या विमानाने दुपारी तीन वाजून ५० मिनिटांनी हैदराबाद येथून लोहगाव विमानतळावर आगमन झाले. ले. जनरल सी. पी. मोहंती, एअर कमोडोर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोधकु मार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. त्यानंतर विमानतळावरून हेलिकॉप्टरमधून पंतप्रधान मोदी सीरम संस्थेकडे रवाना झाले. चार वाजून ४५ मिनिटांनी संस्थेमध्ये त्यांचे आगमन झाले.

मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, कार्यकारी संचालक नताशा पुनावाला यांनी मोदी यांचे स्वागत केले. सीरमतर्फे खास सन्मानचिन्ह देऊन मोदी यांचे स्वागत करण्यात आले.
प्रारंभी अदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर मोदी यांनी संस्थेच्या लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
लस देण्याच्या प्रयत्नांची पूर्वतयारी, आव्हाने आणि नियोजन यांची माहिती शास्त्रज्ञांनी दिली. तासाभरानंतर पंतप्रधान लोहगाव विमानतळाकडे रवाना झाले आणि त्यानंतर हवाई दलाच्या विमानाने दिल्लीकडे प्रयाण केले.

कडक बंदोबस्त

पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यामुळे लोहगाव विमानतळ आणि मांजरी परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव या परिसरातील दुकाने, पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. तसेच या परिसरात फिरण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला होता. दरम्यान, आसाराम बापू यांची त्वरित सुटका करावी, या मागणीसाठी निदर्शने करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

..म्हणून राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती

‘पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यात अगदी कमी कालावधीसाठी सीरम संस्थेला भेट देणार असून लगेचच परतणार आहेत. त्यामुळे राज्यपाल किं वा मुख्यमंत्री यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही,’ असे पंतप्रधान कार्यालयाकडून कळवण्यात आले होते. या सूचनेमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोदी यांच्या पुण्यातील आगमन आणि दौऱ्यात उपस्थित राहिले नाहीत.