जगभरात करोनाने थैमान घातलं आहे. या आजाराने आपल्या जवळच्या लोकांना कायमचं गामावल्याने अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पुणे शहरातही अनेक स्मशानभूमीत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागल्याचे भीषण चित्र पाहण्यास मिळत आहे. या स्मशानभूमीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना दररोज अनेक अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. असाच एक अनुभव कैलास स्मशानभूमीत काम करणारे ललित जाधव यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना सांगितलाय.

नक्की वाचा >> पुणे : अस्थींमुळे करोना होण्याच्या भीतीने नातेवाईक येत नसल्याने पालिका कर्मचारीच करतायत अस्थी विसर्जन

“संध्याकाळची वेळ होती, आम्ही सर्व जण स्मशानात आणले जाणारे मृतदेह विद्युत दाहिनीजवळ एक एक करून ठेवत होतो. तेवढ्यात स्मशानभूमीत एक रुग्णवाहिका दाखल झाली. त्यातील बॉडी आम्ही खाली घेतली. त्या रुग्णवाहिकेच्या बाजूला एक आलिशान चार चाकी गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून दोन मुलं उतरली. त्यांचं वय साधारण आठ ते दहा वर्ष असेल. ते इकडे तिकडे पाहत होत. अचानक माझ्याकडे येऊन म्हणाले, ही माझी आई आहे. आमच्या मागे आता कोणी नाही. आहो मामा आमच्या आईच्या अस्थी मिळतील ना ओ?, असं म्हणत ती दोन्ही मूलं ढसाढसा रडू लागली. त्यांच रडणं पाहुण मला ही रडू आवरल नाही,” असं जाधव यांनी सांगितलं.

“त्या दोन्ही मुलांना जवळ घेऊन आता यांच्याशी काय बोलाव सुचत नव्हतं. बाळांनो रडू नका, त्यांना पाणी आणून दिले. दोघांना शांत केले आणि म्हटलं, बाळांनो हो मी तुम्हाला अस्थी देतो,” असं त्या मुलांना सांगितल्याचं जाधव म्हणाले. “आजवर अनेकांचा इथे आक्रोश पाहिला. पण या मुलाकडे पाहून आता याचं कसं होणार हाच विचार मनात घोंघावत राहिला. पण मी काहींशी बोलो तर ती मृच महिला एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी असल्याची माहिती मिळाली,” असंही जाधव यांनी सांगितलं.